स्वच्छतेचा कार्यक्रम पुढे नेण्याची जबाबदारी आता नागरिकांवर

कैलास शिंदे: शाळा बाह्य मुलांना प्रवाहात आणणार

सातारा,दि.3 प्रतिनिधी- स्वच्छ सर्व्हेक्षणचा सातारा जिल्हा परिषदेला मिळालेला पुरस्कार हा गेल्या 18 वर्षात केलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळे मिळाला आहे. आता स्वच्छतेचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी एकत्र येवून पुढाकार घेतला पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा परिषदेला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुरस्कारचे श्रेय संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियानापासून ते अत्तापर्यंत कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना दिले. यापुढे स्वच्छतेसह, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाचे कार्य हे अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांना पुढे नेण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांनी विशेषत: घनकचरा व सार्वजनिक स्वच्छतेवर भर देणे गरजेचे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पेट्रोलपंपाना सरकार प्रत्येक एक लीटरसाठी 6 पैसे स्वच्छतेसाठी अनुदान देत असते. त्यामुळे आता प्रत्येक पेट्रोलपंपावर स्वच्छतागृहे बांधण्यासाठी सक्तीचे करणार आहे. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून तेथे ऊसतोडीसाठी येणाऱ्या कामगारांची संख्या हजारोंच्या संख्येत आहे. त्यांना कारखानदारांनी स्वच्छतागृहे बांधून देण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक व शिक्षकांवर विशेष जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री व रमाई आवास योजनेतून अत्तापर्यंत 7 हजार 349 नागरिकांना घरकुले दिली आहेत. तर 907 नागरिकांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासकीय जागा उपलब्ध करून देवून घरे देणार आहे. येत्या दिवाळीपर्यंत आवास योजनेतून एकूण 10 हजार घरे पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

-Ads-

साताऱ्यात संधी मिळाली हे माझे भाग्य
सातारा जिल्ह्यात काम करण्याची संधी लोकांनी उपलब्ध करून दिली म्हणून पुरस्कार स्विकारता आला हे माझे भाग्य समजतो, अशा शब्दात शिंदे यांनी जिल्हावासियांचे आभार मानले. तसेच जो पर्यत साताऱ्यात कार्यरत असेन तो पर्यंत शक्‍य तेवढ्या तत्परतेने काम करणार आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कार मिळण्यामागे अहोरात्र कष्ट घेतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कामगिरीचा प्रस्ताव शासनाला पाठविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)