नवी दिल्ली – “स्वच्छता ही सेवा’ या देशव्यापी अभियानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अभिनेते अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांच्या सहभागाच्या व्हिडीओ संदेशाद्वारे पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला. देशातील स्वच्छतेची व्याप्ती ही चार वर्षांपूर्वी 40 टक्के होती.

चार वर्षांपूर्वी “स्वच्छ भारत’ अभियान सुरू केल्यावर ही व्याप्ती 90 टक्‍क्‍यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे, असे पंतप्रधानांनी या व्हिडीओ संदेशादरम्यान सांगितले. दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये स्वच्छता करून पंतप्रधानांनी या अभियानाला प्रारंभ केला.

केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनीही अशाच प्रकारे स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला. गेल्या 4 वर्षात देशभरात 9 कोटी स्वच्छतागृहे बांधली गेली आणि 4.5 लाख गावे हागणदारीमुक्‍त जाहीर झाली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांग़ितले.

2 ऑक्‍टोबर 2015 रोजी सुरू करण्यात आलेल्या “स्वच्छ भारत’ अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरु करण्यात आलेली “स्वच्छता ही सेवा’ ही मोहिम पुढील महिन्यात महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे. समाजातील सर्व गट आणि देशातील सर्व भाग या अभियानामध्ये सहभागी झाले आहेत. महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यास देशवासीय कटिबद्ध असल्याचेच हे निदर्शक आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये स्वच्छता करून पंतप्रधानांनी या अभियानाला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनीही अशाच प्रकारे स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील स्वच्छता अभियानातील यशस्वीतेची माहिती दिली. राज्यातील प्रत्येक कुटुंबाकडे ऑक्‍टोबर 2019 पर्यंत स्वच्छतागृह असेल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. गेल्यावर्षी सत्तेवर आल्यापासून 1.36 कोटी स्वच्छतागृहे बांधली गेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार स्वच्छतेमुळे अतिसाराचे प्रमाण 30 टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्यामुळे 3 लाख जीव वाचले आहेत, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. आसाम, केरळ, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांमधील नागरिकांशी पंतप्रधानांनी थेट संवाद साधला.

सक्रिय सहभाग घेणाऱ्यांचा गौरव…
स्वच्छता अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सद्‌गुरु जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर आणि माता अमृतानंदमयी यांच्या कार्याचा पंतप्रधानांनी गौरव केला. याशिवाय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी मिळून पेंगॉंग लेक आणि लेहच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली, याचाही पंतप्रधानांनी आवर्जुन उल्लेख केला. पाटणा साहिब गुरुद्वारातील शीख धर्मगुरु, अजमेर शरीफ येथील मुस्लिम व्यवस्थापक आणि प्रसार माध्यमाणी घेतलेल्या सहभागाचाही पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)