स्वच्छता रथाद्वारे राज्यभरात जनजागृती

शालिनीताई विखे : आषाढी यात्रेत प्रबोधनासाठी जिल्हा परिषदेचा रथ रवाना

नगर – सार्वजनिक आरोग्य चांगले असेल तर वैयक्‍तिक आरोग्य चांगले राहते. यासाठी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, शौचास जाणे अशा सवयी जाणीवपूर्वक दूर होणे गरजेचे आहे. शौचालय बांधणे व त्याचा नित्य वापर करणे ही सवय अंगीकारणे काळाची गरज आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी यात्रेच्या कालावधीत लाखोंचा जनसागर पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो. या वारीत वैयक्तिक स्वच्छता व शौचालय वापराबाबत होणारे प्रबोधन संपूर्ण राज्यात स्वच्छतेचा संदेश देऊन परिवर्तन घडवणारे ठरेल, असा विश्‍वास जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी व्यक्‍त केला.

पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त नगर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही जनजागृती करणारा रथ नगर ते पंढरपूर दरम्यान वारीत सहभागी होणार आहे. या रथाला जिल्हा परिषदेत अध्यक्षा विखे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, सुभाष कराळे, सचिन थोरात, प्रशांत जगताप, मनोज सकट, अमित भालेराव, किशोर म्हस्के, दीपाली जाधव, सचिन कोतकर, राहुल झिने, किशोर अंधारे, रोहिदास पांढरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे म्हणाले, नगर जिल्हा परिषदेने संपूर्ण राज्याला पथदर्शी ठरणारे अनेक उपक्रम सातत्याने राबविले आहेत. स्वच्छ भारत अभियानातही जिल्ह्यात उत्तम काम चालू आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचे प्रबोधन केले जात आहे. यावर्षी दरवाजा बंद तर आजार बंद’ या घोषवाक्‍यानुसार शौचालयांच्या वापराबाबत व्यापक जागृती करण्यात येत आहे. वारीत सहभागी होणाऱ्या संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत स्वच्छतेचा हा संदेश पोहचविण्यात येणार आहे. यातून संपूर्ण राज्यात चांगले बदल पहायला मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्‍त केला.

स्वच्छता रथाबाबत माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बावके यांनी सांगितले की, नगर जिल्हा परिषदेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी यात्रेवेळी स्वच्छता रथ पाठविण्यात येतो. या रथासोबत असलेले कलापथक आपल्या कलेच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार आहेत. नगर जिल्हा क्षेत्रफळ तसेच लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. जिल्ह्यात शौचालय बांधणी व त्याचा वापर याचे प्रमाण वाढविण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. स्वच्छतेचे काम जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्यात प्रबोधन व्हावे, या हेतून आषाढी वारीत स्वच्छता रथ पाठविण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)