“स्वच्छता दर्पण’द्वारे लोटामुक्तीबाबत जनजागृती

पुणे – जिल्हा हागणदारी मुक्त झाला आहे. नागरिकांनी नियमित शौचालयाचा वापर करावा. तसेच जिल्हा शाश्‍वत हागणदारी मुक्त करण्यासाठी “स्वच्छता दर्पण’ हा उपक्रम 15 जुलैपासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे गाव निहाय स्वच्छतेच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

जिल्ह्यात 6 लाख 23 हजार 626 कुटुंब आहेत. यापैकी 5 लाख 24 हजार 324 कुटुंबांकडे शौचालय होतो. जवळपास 1 लाख 12 हजार 305 कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नव्हते. जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवून एका वर्षामध्ये एक लाखा पेक्षा जास्त शौचालय बांधले आहेत. यामुळे जिल्हा हागणदारी मुक्त झाला आहे. सध्या जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय आहे. मात्र, या शौचालयाचा वापर नियमित होत नाही. शौचालयामध्ये गोदाम करणे किंवा इतर वापर केला जात असल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे येत आहे. केंद्र शासनाने नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा यासाठी “स्वच्छता दर्पण’ हा उपक्रम राबविण्याचे आदेश आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या 75 गटांमध्ये स्वच्छ शोैचालय ही स्पर्धा घेतली जाणार आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये स्वच्छता जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये स्वच्छता जनजागृती करण्यासाठी एक डिजीटल फलक लावण्यात येणार आहे. या डिजीटल फलकावर सिनेकलाकारांची स्वच्छते संदर्भातील संदेश देणारी चित्रफित लावण्यात येणार आहे.

सर्व कुटुंबांनी शौचालय बांधल्याने जिल्हा हागणदारी मुक्त होणार नाही. शौचालयाचा वापर झाला पाहिजे. या योजनांतर्गत गावांमध्ये शौषखड्डे, बायोगॅस, गावातील राडारोडा स्वच्छ केला जाणार आहे. स्वच्छता जनजागृतीसाठी वेगळा उपक्रम राबविणाऱ्या गावांना बक्षिस दिले जाणार आहे. हागणदारी मुक्त गावांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जात आहे. – दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)