स्वच्छता कर्मचाऱ्यांवर “डिजीटल वॉच’!

पिंपरी – महापालिका सेवेतील 1800 आणि कंत्राटी 2200 अशा सुमारे चार हजार स्वच्छता कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस घड्याळांचा आधार घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जीपीएस घड्याळावरील हजेरीच्या आधारेच आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता कामगारांचे वेतन तर कंत्राटदाराचे बील निघणार आहे.

महापालिकेचे क्षेत्रफळ 181 चौरस किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. दैनंदिन साफसफाई, रस्ते स्वच्छता, किटकनाशक फवारणी, नाले सफाई, कचरा संकलन आणि वाहतूक, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी कामे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केली जातात. शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयानिहाय कामगार नेमले आहेत. त्यात सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मलेरिया निरीक्षक, वाहन चालक, आरोग्य सहायक, मुकादम, गटरकुली, सफाई कामगार, सफाई सेवक, कचराकुली, मजुर, स्प्रे कुली, कंपोस्टकुली, शिपाई, मेंटेनन्स हेल्पर सेवेतील 1800 कामगारांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या विस्तारामुळे महापालिकेने साफसफाईकामी बाह्यस्त्रोतांचा (आऊटसोर्सिंग) अवलंब सुरु केला आहे. आजमितीला कचरा संकलन – वहन, रस्तेसफाई, नालेसफाई, झाडलोट, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आदी कामे कंत्राटी कामगारांकडून केली जात आहेत. कचरा वाहतूक वाहनांवर जीपीएस लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोणती गाडी कोणत्यावेळी कुठे फिरते याची माहिती महापालिकेला मिळते. एखाद्या भागात गाडी नियोजित वेळी न गेल्याची तक्रार आली की त्याची लगेच तपासणी होते व संबंधितांना समज दिली जाते किंवा कारवाईही केली जाते.

सफाई कामगारांच्या कामाची वेळ सकाळी सात ते दुपारी दोन अशी आहे. प्रत्येकाला विभाग निश्‍चित करून देण्यात आले आहेत. अनेकवेळा हे सफाई कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षक हे आपल्याला दिलेल्या परिसराऐवजी इतर ठिकाणी फिरत असल्याचे आढळून येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच कर्तव्याच्या ठिकाणी न राहता साहेबांचा आदेशया नावाखाली कार्यालयात नसल्याचे प्रकार अनेकवेळा दिसून आले. या पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांसह आरोग्य निरिक्षकांवरही नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कामाच्या वेळेत इतर ठिकाणी फिरण्याचे प्रकार आता बंद होणार आहेत. आरोग्य निरिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजीटल घड्याळ – व्हिया टॅग दिले जाणार आहे.

चार हजार “डिजीटल घड्याळ’ खरेदी
काही सफाई कामगारांच्या कामचुकारपणामुळे सर्वच कामगारांवर ताशेरे ओढले जातात. त्यामुळे सर्व स्वच्छता कामगारांवर, आरोग्य निरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठी डिजीटल घड्याळ (टॅग) ची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 4000 नगांची खरेदी करण्यात येणार असून, आरोग्य कार्यकारी अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवणार आहे. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत डिजीटल घड्याळांची खरेदी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही घड्याळे उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. यामुळे कर्मचाऱ्याने कोणत्या ठिकाणी किती वेळ काम केले याची माहिती होणार आहे. विशेष म्हणजे, जीपीएस घड्याळावरील हजेरीच्या आधारेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)