स्वच्छता अभियानातील सहभाग नावापुरताच आहे का? 

नगरसेवकाचा नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांना सवाल, पालिका सभागृह अवाक्‌ – अस्वच्छतेबाबत वेधले लक्ष

महाबळेश्‍वर – स्वच्छता अभियान 2018 मधील स्पर्धेत अव्वल स्थान मिळविण्याचे स्वप्न पाहणारी महाबळेश्‍वर पालिका कशीबशी 19 व्या नंबरपर्यंतच पोहोचली. त्यामुळे पालिकेचे मनोधैर्य ढासळले असल्याचे दिसून येत असल्याने पालिकेचे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. जागोजागी कचरा दिसत असून अशीच काही महिने स्थिती राहिली तर महाबळेश्‍वरचा लौकिक आहे तेवढा देखील राहणार नाही अशी शंका व्यक्त करून महाबळेश्‍वर पालिकेने या वर्षीच्या अभियानात भाग घेतला आहे का? असा सवाल नुकत्याच पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी गटातील जेष्ठ नगरसेवक युसूफ शेख यांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना केल्याने सभागृह अवाक्‌ झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाबळेश्‍वर व पाचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणे, महाराष्ट्राची लाडकी पर्यटन स्थळे म्हणून ओळखली जातात. या दोन्ही शहरांनी केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियान 2018 या स्पर्धेत भाग घेतला होता. विशेष म्हणजे या दोन्ही पालिकांचा कारभार अमिता दगडे पाटील या मुख्याधिकारी म्हणून पहात आहेत. या दोन्ही पालिकांपैकी एकतरी अव्वल येणार आणि दुसरी पहिल्या पाचमध्ये येणार असा विश्‍वास मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला होता. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे पाचगणी पालिका ही अव्वल स्थानी आली. मात्र महाबळेश्‍वर पालिका पहिल्या पाचमध्ये नाही, पहिल्या दहामध्येही नाही तर तब्बल 19 क्रमांकावर खाली घसरली.

अव्वल क्रमांकाच्या दाव्यातील हवा निघुन गेली आणि तो दावा म्हणजे वल्गनाच ठरली. पालिकेचा क्रमांक घसरल्याचा ठपका एका सर्वसाधारण सभेत भाजपाचे नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांनी मुख्याधिकारी यांच्यावर ठेवला व मुख्याधिकारी यांच्यावर स्वच्छता अभियानाच्या कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. कुंभारदरे यांच्या आरोपाने मुख्याधिकारी यांचे डोळ्यात पाणीच आले आणि त्या भावुक झाल्या. तेव्हापासून मुख्याधिकारी यांनी महाबळेश्‍वरपेक्षा पाचगणीमध्येच जास्तवेळ देण्यास सुरूवात केली. त्यामुळे पुन्हा महाबळेश्‍वरमधील स्वच्छता अभियान राम भरोसे झाले आहे.

माजी नगराध्यक्ष व सत्ताधारी गटातील विद्यमान नगरसेवक यांनी सर्व सभागृहाचे लक्ष शहर स्वच्छतेकडे वेधले. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आपल्या शहराचा जो लौकिक मिळाला आहे तो राहणार नाही, आपल्या शहराचे नाव टिकले पाहिजे. करोडो रुपये खर्च करून जर गाव स्वच्छ दिसत नसेल तर त्याचा काहीही फायदा नाही, अशी खंत व्यक्त करून यासाठी पुन्हा स्वच्छता अभियान जोमाने राबविणे आवश्‍यक आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी झालेल्या चर्चेत संदीप साळुंखे, रविंद्र कुंभारदरे, उज्वला तोष्णीवाल यांनी सहभाग घेतला. नगरसेवक युसूफ शेख यांनी सभागृहात व्यक्त केलेल्या मुद्यावर नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना काहीही समर्पक उत्तरे देता आली नाही यातच सर्व काही आले अशी चर्चा सर्वसाधारण सभेनंतर पालिका वर्तुळात रंगली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)