स्वच्छतागृहाची अज्ञातांकडून मोडतोड

ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

उंब्रज, दि. 6 (वार्ताहर) -येथील कॉलेज रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक असणार्‍या स्वच्छता गृहाची अज्ञातांंनी मोडतोड करुन काही महिने उलटले तरी या पडलेल्या स्वच्छतागृहाची नादुरुस्त झाली ना नव्याने उभारणी झाली. स्वच्छतागृहा अभावी या परिसरातील दुकानदार, नागरिक व वाटसरुंची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते आहे. समाजकंटकाने स्वच्छता गृहाची केलेली मोडतोड आणि ग्रामपंचायत प्रशासनाने यावर ठोस निर्णय न घेतल्याने लघुशंकेला जायचे कुठे असा पेच निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज, ता. कराड येथील कॉलेज रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्रानजीकच्या रस्त्यावर ग्रामपंचायतीचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभे होते. या स्वच्छता गृहामुळे या परिसरातील व्यावसायिक, रहिवाशी, वाटसरु यांची सोय झाली होती. नियमित, मोठ्या प्रमाणात या स्वच्छता गृहाचा वापर पुरुष मंडळींकडून सुरु होता. पंरतु अज्ञात विघ्नसंतोषी व्यक्तींकडून काही महिन्यांपूर्वी हे स्वच्छता गृह पाडले गेले. तेव्हापासून व्यापारी, नागरिक यांची गैरसोय सुरु झाली आहे.
मुळातच उंब्रज येथे स्वच्छता गृहांचा अभाव आहे. परिसरातील शेकडो गावे, वाड्यावस्त्यांवरील लोक बाजारहाट व इतर कामांसाठी नियमितपणे उंब्रजला ये-जा करत असतात. पंरतु याठिकाणी स्वच्छता गृहांचा अभाव असल्याने लघुशंकेला जाणारांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छता गृह असावे अशी मागणी करीत आहेत. मात्र अद्याप याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नसल्याने पुरुष व महिला वर्गाची कुचंबना होत आहे. त्यातच अज्ञाताने कॉलेज रोडवर असणारे एकमेव स्वच्छता गृह पाडले आहे. ते पुन्हा त्वरित उभे करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
याबाबत उंब्रज ग्रामपंचायत प्रशासनाकडे चौकशी केली असता या बाबतचा लवकरच निर्णय घेऊ असे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)