” स्वच्छंद’ मधून घडलं विंदांच्या समग्र साहित्याचे दर्शन

सातारा ः " स्वच्छंद' कार्यक्रम सादर करताना वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कलाकार.

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) – मिश्‍कीलता आणि उपरोध हा विं. दा. करंदीकर यांच्या साहित्याचा विशेष गुण त्यामुळेच त्यांच्या साहित्यातील मानवहितकारी विचार कालातीत ठरतो. समता, बंधुता आणि करुणा यांचे प्रगटीकरण म्हणजे विंदांची समग्र काव्य प्रतिभा. त्यांच्या या समग्र साहित्यांचे दर्शन साताऱ्यातील रसिकांना वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान निर्मित ” स्वच्छंद’ या साहित्य अभिवाचन कार्यक्रमातून घडले.
विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मसाप, शाहुपुरी शाखा आणि ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांच्या संयोजनातून नगरवाचनालयातील पाठक हॉलमध्ये राज्य मराठी विकास संस्था प्रायोजित ” स्वच्छंद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि विंदांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रयोगातून विंदांचे ललित, नाटक, कविता, बालकविता, अनुवाद आणि वैचारिक साहित्याचे प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले. पंडित यांचे अर्थाच्या अंगाने जाणारे वाचन, घाणेकर यांच्या आवाजातील प्रासादिकता, डॉ.फराकटे यांचे विंदाच्या इंग्रजी अनुवादाचे भाववाही सादरीकरण, माधव गावकर यांच्या गायन-संगीत साथीमुळे हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनाचा तळ गाठणारा ठरला.
या कार्यक्रमात विंदाच्या पहिल्या स्वातंत्र्योत्कट कवितेपासून अखेरच्या निर्वाणीच्या गझलांपर्यंतच्या काव्यलेखन प्रवासाचा वेधक आढावा घेतला गेला. स्वेदगंगा मधील क्रांतीच्या कवितेपासून सुरु झालेला हा प्रवास मिसिसिपीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचा शोध घेऊन मानवतेच्या उदात्त भावनेपर्यंत पोचल्याने उपस्थित श्रोते उदात्त भावनेने भरुन गेली. या कार्यक्रमातील निवेदकांची विशेषत: वामन पंडित व माधव गावकर यांची कामगिरी प्रेक्षक श्रोत्यांच्या ह्दयापर्यंत थेट पोहचते. अनिल व जाई फराकटे यांच्याकडे मुख्यतः गद्य निवेदने आणि कवितावाचन होते. त्यांनी एकूण कार्यक्रमातील नाटयमयता आणि संगीत यांना पूरक अशीच पण भरीव कामगिरी केली आहे.
कार्यक्रमाची संहिता डॉ. विद्याधर करंदीकर यांची होती तर निर्मिती, संकल्पना, नेपथ्य वामन पंडित यांचे होते. यावेळी वामन पंडित, अनिल फरकाटे, जाई फरकाटे, माधव गावकर आणि सहकारी यांनी कार्यक्रम सादर केला. प्रांरभी संयोजकांच्यावतीने कलाकारांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी केले. आभार नंदकुमार सावंत यांनी मानले. कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीच्या समाप्तीनिमित्त हा प्रयोग सातारकरांना मंत्रमुग्ध करुन केला. कार्यक्रमास साता-यातील कवीप्रेमी, साहित्यिक, मसाप शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, सभासद आणि प्रतिष्ठित सातारकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)