स्वच्छंदी

अबाउट टर्न

वाट पाहीन; पण एसटीनंच जाईन… या सरकारी ब्रिदवाक्‍याला कोरस देणाऱ्यांपैकी आम्ही एक आहोत. वस्तुतः खासगी बसने जायचं ठरवलं तरी बसच्या सर्व सिटा भरल्याखेरीज ती सुटत नाही आणि तेवढ्यात एसटीच्या दोन-तीन गाड्या डोळ्यांसमोरून भुर्रकन निघून जातात, याचा अनुभव घेतल्यामुळं आमचा हा निर्धार पक्का झाला आहे. एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास हे ब्रिदवाक्‍यही आम्ही गर्दीतून वाट काढत एसटीच्या दारातून आत शिरताना अनेकदा मनापासून आळवलंय. प्रवास सुरक्षित होईल, काही अनुचित, अप्रिय असं घडणार नाही, घडलंच तर मायबाप सरकारकडून भरपाई मिळेल, याची आम्हाला शिगोशीग खात्री वाटते.

त्यामुळंच गर्दीसह अनेक बाबी दुर्लक्षित करीत एसटीच्या दारापाशी झोंबाझोंबी करण्याचा प्रसंग आम्ही शेकडो वेळा अनुभवलाय. शिवनेरी आदी श्रीमंत गाड्यांचा प्रवास परवडत नाही म्हणून अनुभवलेला नाही; परंतु केवळ अर्ध्या तासाच्या प्रवासाने घसा बसण्याचे प्रसंग आयुष्यात येऊन गेलेत. जेव्हा बसचे सगळे अवयव वेगवेगळे आवाज करीत असतात तेव्हाच नेमकी सहप्रवाशाला गप्पा मारण्याची हुक्की येते आणि मग जोरात बोलून घसा बसतो. प्रवास कितीही आडवळणाचा असला, तरी आम्हाला एसटी कधी लागलेली नाही. परंतु शेजारी किंवा सहप्रवासी त्या बाबतीत संवेदनशील असल्याचे अनेक प्रसंग आम्ही झेललेत. आपलं शहर हाकेच्या अंतरावर आल्याबरोबर गाडी जेवणासाठी अर्धा तास थांबते, हेही अनेकदा मुकाट्यानं सहन केलंय. थोडक्‍यात, केवळ वाट पाहणंच नव्हे तर एसटीसाठी सबकुछ केलंय!

एसटीनंही आम्हाला अनेक सुखद अनुभव दिलेत. आधीच बुकिंग करून विनाथांबा, विनावाहक प्रवास घडवला. गाडी कशी का असेना; आत वायफाय सुरू केलं. तेही फुकटात! प्रवास लांबचा असेल, तर ठराविक अंतरानं ड्रायव्हर बदलेल याची काळजी घेतली. जेव्हा आम्ही ज्येष्ठ नागरिक होऊ तेव्हा तर एसटी आम्हाला अर्ध्या तिकिटात फिरवेल. त्यामुळंच आतापर्यंतच्या जीवनप्रवासात एसटीचा हात आम्ही कधी सोडला नाही. पण परवा एसटीच्या ड्रायव्हरनंच व्हॉट्‌सऍप, फेसबुक बघण्यासाठी स्टिअरिंगवरचा हात सोडल्याचा व्हिडिओ बघितला, तेव्हा मात्र आम्ही भलतेच कॉन्शस झालो राव! योगायोगानं हा व्हिडिओ बघताना आम्ही एसटीतच होतो आणि फुकटच्या वायफाय सेवेद्वारेच हे दृष्य बघितलं. याच सेवेचा लाभ आमचा ड्रायव्हरसुद्धा घेतोय का, हे काळजीपूर्वक वाकून पाहिलं आणि तसं काही नाही हे कळल्यावर निःश्‍वास सोडला. तरी अधूनमधून ड्रायव्हरच्या केबिनमध्ये डोकावत राहिलोच. सोशल मीडियावरचे बरेच फोटो, व्हिडिओ बोगस असतात, अशी मनाची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्नही केला. परंतु धास्ती वाटतच राहिली. कधी नव्हे ते देवाचं नावही आलं तोंडात.

इंटरनेट आणि सोशल मीडियाचं वेड लोकांना काम करू देत नाही, हे आम्ही जाणतो. कामापेक्षा अधिक वेळ ऑफिसात थांबावं लागलं तर गृहखात्याचे अधिकारीही कसले-कसले व्हिडिओ बघायचे, हे माजी गृहसचिवांनी नुकतंच उघड केलंय. शीण घालवत असतील बिचारे! पण काही कामं अशी असतात, जिथं सोशल मीडियाची झुळूकसुद्धा सहन होत नाही. ड्रायव्हरचं काम त्यापैकी एक आहे, असं आम्ही मानतो. संबंधित व्हिडिओ पैठण-बीड एसटीचालकाचा असल्याचं स्पष्ट झालंय. स्वच्छंदी वाहनचालनाचा हा अखेरचा व्हिडिओ ठरावा, एवढीच माफक अपेक्षा!

– हिमांशू


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)