स्वकष्टार्जित मिळकतीत अनौरस मुलांचा हिस्सा 

पुरुषोत्तम मयत झाल्यानंतर त्याच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे वाटप करण्यात आले. त्या वाटपात मयत पुरुषोत्तमच्या अनौरस मुलालाही हिस्सा देण्यात आला. वाटपानुसार मिळकतीवर नावे दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात लेखी अर्ज, संबंधित कागदपत्रांसह सादर करण्यात आली. सदर नोंदणीकृत वाटपाची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावली. नोटीस मिळाल्यावर मयत पुरुषोत्तमचा मोठा औरस मुलगा अभिषेक तलाठी यांच्याकडे आला आणि मयत पुरुषोत्तमच्या अनौरस मुलाला मिळकतीत हिस्सा मिळण्याचा हक्‍क प्राप्त होत नाही, अशी लेखी तक्रार त्याने दाखल केली.

तलाठी भाऊसाहेबांनी त्याला तक्रारीची पोहोच नमुना 10 मध्ये दिली. त्यानंतर ती तक्रार गाव नमुना 6-अ मध्ये नोंदवली आणि संबंधित 7/12 उताऱ्यावर पेन्सिलने तक्रार असे संदर्भासाठी लिहून ठेवले. मंडलअधिकारी चावडीला भेट देण्यास आले तेव्हा तलाठी यांनी ही तक्रार त्यांच्या निदर्शनास आणली. मंडलअधिकारी यांनी नमुना 12 मध्ये सर्व हितसंबंधितांना नोटीस देऊन 15 दिवसांनंतर सर्वांना त्याच चावडीत, पुराव्याच्या कागदपत्रांसह हजर ठेवण्याचे निर्देश तलाठी यांनी दिले.

-Ads-

सुनावणीच्या दिवशी मंडलअधिकारी यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे नोंदवले आणि खालील आशयाचा कायदेशीर निकाल दिला, ‘अनौरस मुलाला एकत्र कुटुंबातील मिळकतीत हिस्सा मिळण्याचा हक्‍क प्राप्त होत नाही (ए.आय.आर. 1983, मुंबई 222; ए.आय.आर. 1987, मुंबई 182; ए.आय.आर. 1996 एस.सी. 1963) परंतु हिंदू मॅरेज ऍक्‍ट, 1955, कलम 16 अन्वये वडिलांच्या स्वकष्टार्जित मिळकतीत अनौरस मुलाला हिस्सा मिळण्याचा हक्‍क प्राप्त होतो. (ए.आय.आर. 1996, एस.सी. 1963) त्यामुळे वादीचा हरकत अर्ज फेटाळण्यात येत आहे.’

(संदर्भ : हिंदू मॅरेज ऍक्‍ट, 1955, कलम 16; महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 149 व 150.) 

परदेशी नागरिकाने भारतात शेतजमीन खरेदी करणे 

जॉन डिकोस्टा या परदेशी नागरिकाने उत्तमरावांकडून त्यांच्या मालकीची असणारी शेतजमीन खरेदी केली. या व्यवहाराची संबधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद घेतली. सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावली.

मुदत कालावधी संपल्यानंतर मंडलअधिकाऱ्यांनी ती नोंद ‘फेमा कायद्याचे उल्लंघन’ असा शेरा नोंदवून रद्द्‌ केली. तलाठी भाऊसाहेबांनी कारण विचारल्यावर मंडलअधिकाऱ्यांनी खुलासा केला की, परदेशी नागरिकाच्या भारतातील स्थावर मालमत्ता खरेदीचे नियमन परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) 1999, कलम 6(3) अन्वये केले जाते.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) 1999, कलम 2 (व्ही),2 (डब्ल्यू) अन्वये परदेशी नागरिक म्हणजे, (1) अनिवासी भारतीय (छठख) किंवा मूळ भारतीय वंशाचा परदेशी नागरिक (झखज) किंवा मूळ भारतीय वंशाचा नसलेला परदेशी नागरिक असे नमूद आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) 1999, कलम 6(5) अन्वये अनिवासी भारतीय किंवा मूळ भारतीय वंशाचा परदेशी नागरिक भारतामध्ये शेतजमीन वगळता इतर स्थावर मालमत्ता खरेदी किंवा धारण करू शकतो.

पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, चीन, इराण, नेपाळ व भूतान या देशातील नागरिकांना भारतात स्थावर मालमत्ता खरेदी करता येत नाही. तथापि, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पूर्वपरवानगीने “पाच वर्षापेक्षा जास्त नाही’ अशा मुदतीकरिता शेतजमीन वगळता इतर स्थावर मालमत्ता भाडेपट्टीने घेता येऊ शकते. या निमित्ताने तलाठी भाऊसाहेबांना एका नवीन कायद्याचे ज्ञान मिळाले.

(संदर्भ : परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) 1999, कलम 6(3) 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)