स्मिथ व वॉर्नर यांच्यावर एका वर्षासाठी बंदी

       वॉर्नर कधीही कर्णधार होणार नाही; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय

सिडनी – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात “बॉल टॅम्परिंग’मध्ये सहभागी झालेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षासाठी सर्वकष बंदी ठोठावण्यात आली आहे. तसेच चेंडूचा आकार बदलण्यात प्रत्यक्ष सहभागी झालेला वेगवान गोलंदाज बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

“क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने आज हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या तिघांना बंदीच्या काळात कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामन्यात खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे या वर्षअखेरीस मायदेशात भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेतही हे तीनही खेळाडू खेळू शकणार नाहीत. मात्र या तिघांना क्‍लब स्तरावरील सामने खेळता येणार आहेत. त्यामुळे बंदीच्या काळानंतर त्यांना लवकरात लवकर पुनरागमन करता येणार आहे. त्याच वेळी बंदीची शिक्षा संपल्यावर आणखी एका वर्षासाठी स्मिथ व बॅंक्रॉफ्ट यांचा कर्णधारपदासाठी विचार करण्यात येणार नाही. तर डेव्हिड वॉर्नरला कधीच नेतृत्वाची संधी देण्यात येणार नसल्याचेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले.

स्मिथ, वॉर्नर व बॅंक्रॉफ्ट यांनी रचलेल्या “बॉल टॅम्परिंग’च्या कटामुळे केवळ क्रिकेट ऑस्ट्रेलियाचीच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्‍वाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या विश्‍वासार्हतेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये मैदानावर रंगलेली स्लेजिंगची जुगलबंदीही गाजली होती. ऑसी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व आफ्रिकेचा क्‍विन्टन डी कॉक यांच्यातील शाब्दिक चकमक टोकाला पोहोचली होती. परिणामी उभय संघांचे खेळाडू पॅव्हिलियनकडे परतत असताना डी कॉकवर धावून जाणाऱ्या वॉर्नरला सहकाऱ्यांनी रोखल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. उभय संघांमधील या शत्रुत्वाची परिणती “बॉल टॅम्परिंग’मध्ये झाल्याचे मानले जात आहे.

वॉर्नर हाच “बॉल टॅम्परिंग’च्या कटातील खरा खलनायक असल्याचे ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी म्हटले असून वॉर्नरला संघातून बाहेर काढण्याची मागणीही त्यांनी केली असल्याचे वृत्त आहे. दरम्यान ऑसी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने “क्‍लीन चिट’ दिली असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. दरम्यान स्मिथ, वॉर्नर व बॅंक्रॉफ्ट हे तिघेही लगेचच मायदेशी परतत असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध येत्या शुक्रवारी सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व टिम पेनेकडे सोपविण्यात आले आहे. तसेच निलंबित झालेल्या तिघांच्या बदली ग्लेन मॅक्‍सवेल, जो बर्न्स व मॅट रेनशॉ यांचा संघात समावेश करण्यात आला असून हे तिघेही आजच दक्षिण आफ्रिकेकडे रवाना होत आहेत.

   यंदाच्या आयपीएलमधून स्मिथ, वॉर्नर निलंबित

“बॉल टॅम्परिंग’ प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केल्यानंतर लगेचच यंदाच्या आयपीएलमधून या दोघांना निलंबित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही जाहीर केला. आयपीएलच्या 11व्या मोसमात स्टीव्हन स्मिथ राजस्थान रॉयल्स संघाचे, तसेच डेव्हिड वॉर्नर सनरायजर्स हैदराबादचे नेतृत्व करणार होता. परंतु या दोगांनीही आपल्य पदाचा राजीनामा पाठविला होता. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्‍ला यांनी आज बंदीचा निर्णय जाहीर करताना सांगितले की, आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघटनांनी निलंबनाचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमचाही निर्णय जाहीर करीत आहोत. स्मिथ व वॉर्नर या दोघांसाठी बदली खेळाडू निवडण्यात येतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)