स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा – ऑस्ट्रेलिया सरकार 

 चेंडू छेडछाड प्रकरण 
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसऱ्या कसोटीत चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर काहीवेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज टीम पेन ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व करेल. याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलॅंड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलीयानेया प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सॅंडपेपर काढून, आधी चेंडू त्या सॅंडपेपरने घासला आणि मग तो सॅंडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पॅंटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्‍य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. सीए या सर्व प्रकरणाची चौकशी करणार आहे. स्टीव्ह स्मिथनेही आपली चूक मान्य केली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
ही घटना धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील बातम्या सकाळी-सकाळी पाहून दुःख झालं. ऑस्ट्रेलिया संघाच्या या प्रकारामुळे विश्वासाला तडा गेला असल्याचंही ते म्हणाले. संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. त्यामुळे लवकरच क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर कारवाई करेन, अशी अपेक्षा करत असल्याचं टर्नबुल म्हणाले.
स्मिथकडून घटनेची कबुली 
घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असं मान्य केलंय. चेंडूशी छेडछाड करून आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा आमचा प्रयत्न होता, संपूर्ण संघाला याबाबत माहिती होती, असं स्मिथने मान्य केलं. ही जबाबदारी कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर सोपावण्यात आली होती असंही तो म्हणाला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट पत्रकार परिषदेत आले. जे काही झालं ते टीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. हा महत्वाचा सामना होता. पण चेंडूपासून कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून सामन्यात पुनरागमन करता यावं यासाठी संघातील काही खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली स्मिथने दिली. चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. आणि माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,” असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)