स्मार्ट सिटी निधीच्या खर्चाची माहिती घेऊ – बापट

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आलेल्या निधीतून किती योजना झाल्या आणि किती निधी खर्च झाला, याची लेखी माहिती पुढील आठवड्यात घेऊ. एका पाठोपाठ एक प्रकल्प येत असताना नवीन प्रकल्पाची घोषणा होताना पुर्वी जाहीर झालेला प्रकल्प मागे पडू नये, याची प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

पीएमआरडीएच्या विकास आराखडा प्रक्रियेतील हद्द निश्‍चितीसाठी नकाशे आज प्रसिद्ध करण्यात आले. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश बापट यांनी महापालिकेशी संबधित विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. यामध्ये प्रामुख्याने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या शौचालयांच्या कामातील घोटाळा, स्मार्ट सिटीतील प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यावरील खर्चाच्या प्रश्‍नांना बापट यांनी रोखठोक उत्तरे दिली.

शहरात एकापाठोपाठ मोठ्या प्रकल्पांची घोषणा होत असताना त्याअगोदर जाहीर झालेल्या प्रकल्पांची कामे अद्याप सुरूच नाहीत किंवा ती रेंगाळली आहेत. नवीन प्रकल्प आला की प्रशासनाच्या प्रमुखांकडून जुन्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष होत असल्याने केवळ प्रकल्प केवळ कागदावरच दिसत आहेत याकडे गिरीश बापट यांचे लक्ष वेधून घेण्यात आले. यावर बोलताना बापट म्हणाले, की प्रकल्पांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. परंतू प्रत्यक्षात काम प्रशासनच करत असते. सर्व कामांचा समन्वय ठेवून त्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी प्रशासनाने काळजी घ्यायला हवी. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आलेल्या निधीतून किती योजना झाल्या आणि किती निधी खर्च झाला, याची लेखी माहिती पुढील आठवड्यात घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)