“स्मार्ट सिटी’त महिला असुरक्षितच!

शर्मिला पवार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड कामगारनगरीची “स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरु असल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी शहरातील महिला सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, अश्‍लिल वर्तनाद्वारे महिलांचे खच्चीकरण सुरू आहे. परिमंडळ दोनमध्ये मागील दहा महिन्यांत विनयभंगाचे 103 गुन्हे दाखल झाले आहेत. काही महिलांनी पोलीस ठाण्याची पायरी दाखविण्याचे धाडस दाखविले असले तरी बदनामी पोटी अनेक महिला निमूटपणे हे प्रकार सहन करत आहेत.

शहराची लोकसंख्या 22 लाखांच्या घरात पोहचली आहे. त्यापैकी महिलांची संख्या 40 ते 45 टक्‍के आहे. औद्योगिक परिसरासह, आयटी परिसर तसेच सरकारी व खासगी आस्थापनांमध्येही महिला मोठ्या संख्येने काम करतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, अश्‍लिल वर्तन करणे या साऱ्या घटना त्यांचे खच्चीकरण तसेच त्यांची कुचंबना करणाऱ्या ठरत आहेत. यासाठी कायद्याने महिलांना याप्रकरणी दाद मागण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तरीही अशा कित्येक घटना आहेत, ज्या बदनामीच्या भीतीने आजही पोलीस ठाण्यापर्यंत पोहचलेल्या नाहीत. महिलांना कामाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालय, शेजारी, प्रवासात असे अनेक कटू अनुभव येत असतात. तर सध्या दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमध्ये ऑनलाईन किंवा सोशल मीडियावरुन देखील विनयभंग केला जात आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये एका 46 वर्षीय महिलेचा व्हॉटसऍप व्हिडीओ कॉलवरुन विनयभंग करण्यात आला होता. अनेक तरुणींनी सुद्धा त्याच फेसबूकवरुन विनयभंग झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. तर वाकड येथे घडलेल्या घटनेत एक रिक्षा चालक रस्त्यावर महिलांना पाहून अश्‍लिल वर्तन करत होता. मात्र त्याच्या विरोधात कोणी तक्रार देत नसल्यामुळे तो हे बिनधास्तपणे करत होता. मात्र अखेर त्याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व त्याचा फोटो “व्हायरल’ केला गेला. यावेळी केवळ त्याने वाकड परिसरातच नाही तर निगडी, सांगवी अशा शहरातील विविध परिसरात असे प्रकार केल्याने त्याच्या विरोधात 40 च्या आसपास तक्रारी पोलिसांकडे आल्या.

वाकड पोलीस ठाण्यातच दाखल झालेल्या एका गुन्ह्यात एक विकृत वर्तमानपत्रात आलेल्या महिलांच्या फोन क्रमांकावर फोन करुन महिलांशी अश्‍लिल बोलत होता. या घटना जेवढ्या विकृत आहेत तेवढ्याच समाजाला विचार करायला लावणाऱ्या आहेत. पोलिसांनी यासाठी एक पाऊल उचलले देखील आहे. मुली किंवा महिला या त्यांच्याजवळ असणाऱ्या तक्रार पेटीत निनावी तक्रार टाकू शकतात. मात्र काही घटनांमध्ये या कलमांचा गैरवापरही होताना दिसून येतो. यामध्ये महिला काही वैयक्तीक राग काढण्यासाठी सुद्धा अशी तक्रार करतात. मात्र याची शहानिशा ही पोलीस तपासाअंती होतेच.

परिमंडळ दोनमध्ये दहा महिन्यांत दाखल विनयभंगाचे गुन्हे
हिंजवडी – 17
सांगवी – 18
वाकड – 35
देहुरोड – 13
तळेगाव – 15
तळेगाव एमआयडीसी – 5
चिखली – 5


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)