“स्मार्ट सिटी’चे सर्व प्रकल्प पिंपळे गुरवमध्येच कसे?

दत्ता साने यांचा सवाल : आमदारांकडून सारवा-सारव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा “स्मार्ट सिटी’त समावेश झाल्याचा आम्हाला देखील आनंद आहे. मात्र सर्वच प्रकल्प पिंपळे गुरवसारख्या उच्चभ्रू परिसरातच कसे बरे? असा सवाल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केला. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ता काळातच झालेल्या सर्वेक्षणानंतरच हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्टीकरण देत आमदार लक्ष्मण जगताप व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वेळ मारुन नेली.

पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारच्या “स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी व विविध महाविद्यालयातील तरूणांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीची सभा महापालिका आयुक्त कक्षात शुक्रवारी (दि.31) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात राबविल्या जाणाऱ्या 250 कोटींच्या विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले. बायसिकल शेअरिंग व अन्य प्रकल्प राबविण्यासाठी वाकड व पिंपळे सौदागर या दोन ठिकाणांची निवड झाली होती. मात्र, अचानकपणे या दोन्ही ठिकाणांऐवजी पिंपळे गुरवची निवड कोणत्या निकषांच्या आधारे करण्यात आली? असा प्रश्‍न साने यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात शहरात केलेल्या सर्वेक्षणानुसार पिंपळे गुरवला मिळालेल्या सर्वाधिक पसंतीनंतरच “स्मार्ट सिटी’चा बायसिकल शेअर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले. त्याला मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी दुजोरा दिला. या स्पष्टीकरणावर समाधान न झालेल्या साने यांनी या निवडीसाठी केलेल्या सर्वेक्षणाची माहिती देण्याची मागणी केली. याचवेळी खासदार अमर साबळे यांनी देखील ऑनलाईन सर्वेक्षणात शहराच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे योगदान किती ? असा सवाल उपस्थित केला. मात्र, आयुक्त हर्डीकर यांना याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावर “स्मार्ट सिटी’चे प्रकल्प राबविताना शहराच्या ग्रामीण भागाचा देखील समावेश केला असता तर ते संयुक्तिक ठरले असते, अशी मागणी केली.

केबल खोदाईची दुकाने बंद करा!
“स्मार्ट सिटी’अंतर्गत कामे करताना शहरात केबलचे जाळे पसरविले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. हा धागा पकडत शहरात केबल टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विनापरवाना खोदकाम केले जात आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. अशा व्यक्तींची दुकाने बंद करुन, त्यांच्यावर कारवाई कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली.

पहिल्या टप्प्यात 250 कोटींच्या निविदा
“स्मार्ट सिटी’तील समावेशानंतर पिंपरी-चिंचवड शहरात सुविधांचे जाळे उभे करण्यासाठी विविध कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात केबलचे जाळे निर्माण करण्याबरोबरच अन्य कामांसाठी एकूण 250 कोटींच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मात्र, या कामांमध्ये “रिंग’ होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याचे या सभेत स्पष्ट करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)