स्मार्ट सातारा पोलिसांची गोडोली चौकी कधी होणार स्मार्ट

 

चौकीच्या चारी बाजुंना भगदाडे, कर्मचारी करत आहेत जीव मुठीत धरुन काम

प्रशांत जाधव
सातारा, दि. 11-

पोलिस ठाणे म्हटले की समोर येते ती शासकीय इमारत, कैद्यांचे लॉकअप, पोलिसांची लगबग. मात्र, सातारा शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गोडोली पोलिस चौकीच्या नशिबी हा थाट नाही. पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून पोलिस ठाण्याचा गाडा हाकला जात आहे. पावसाळ्यात बदाबदा गळणारे तर उन्हाळ्यात गरमीने हैराण करणारे पत्रे. चौकीच्या चारी बाजुंनी पडलेली भगदाडे, त्यातून येणारा भलामोठा नागोबा.ज्यामुळे चौकीत बसलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आपला जीव मुठीत धरून काम करावे लागते. महाराष्ट्रात सर्वात प्रथम स्मार्ट पोलिस दल म्हणून लौकीक मिरवणाऱ्या सातारा पोलिस दलाचा हिस्सा असलेल्या गोडोली चौकीची अवस्था पाहीली तर तिथे काम करणाऱ्या पोलिसांची किव करावी वाटते. जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी चौकीच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

प्रारंभापासून ग्रहण
सुरुवातीपासूनच या पोलिस चौकीला ग्रहण लागले आहे. स्थापनेपासून या चौकीला पक्की इमारत मिळाली नाही. तात्पुरत्या स्वरुपात पत्र्याच्या शेडमध्ये हे पोलिस ठाणे उभारण्यात आले. प्रभारी निरीक्षकांचे केबिन, ठाणे अंमलदार, रायटर, गोपनीय शाखा, मुद्देमाल रूम सर्व काही एकाच शेडखाली आहे. लहान शेड उभारून त्यामध्ये पोलिस चौकीचे कामकाज केले जात आहे.

पावसाळ्यात गळती, उन्हाळ्यात उकाडा
पूर्णपणे पत्र्याचे छत असल्याने येथे अनेक अडचणीचा सामना पोलिसांना करावा लागतो. पावसाळ्यात पोलिस चौकीला अनेक ठिकाणी गळती लागते, तर उन्हाळ्यात उकाड्यामुळे आत बसणे शक्‍य होत नाही. त्यामुळे काम करावे तरी कसे, हा प्रश्‍न येथील पोलिसांना पडलेला यक्षप्रश्‍न आहे

लॉकअप, इन्टरॉगेशन रूमची वानवा

प्रत्येक पोलिस चौकीला आरोपीला तात्पुरते ठेवण्यासाठी लॉकअपची व्यवस्था असते. ही चौकी त्याला अपवाद आहे. पकडून आणलेल्या आरोपीला एखाद्या खोलीत बसवावे म्हटले तरी वेगळी खोलीसुध्दा नाही. त्याच्या देखरेखीसाठी पुन्हा पोलिस कर्मचाऱ्याला अडकून बसावे लागते. इन्टरॉगेशन रूमची सोय या पोलिस चौकीत तर औषधाला नाही. त्यामुळे आरोपीच्या चौकशीमध्ये अडचणी निर्माण होतात.

महिला कक्षाची गरज
बहुतेक पोलिस ठाण्यात महिला कर्मचारी, अधिकांऱ्यासाठी महिला कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. पण गोडोली पोलिसांना हक्काची जागा व ज्याच्या खाली बिनधास्त बसावे असा निवारासुध्दा नसल्याने महिला कक्ष खूप दूरची गोष्ट आहे.

अपुरा कर्मचारी वर्ग
पोलिस चौकीची हद्द मोठी असून, पोलिस चौकीला कामही प्रचंड आहे. सध्या येथे एका पोलिस उपनिरीक्षकासह मोजकेच मनुष्यबळ आहे. त्यामुळे साप्ताहिक किंवा अन्य सुट्या, तपास, अपघात, बिट मार्शल या कामात पोलिसांची वानवा भासत आहे.

पार्किंगचा बट्याबोळ
पोलिस ठाण्यासमोर काही मोकळी जागा आहे. या ठिकाणी कर्मचारी व अधिकारी त्यांची वाहने पार्क करतात. शिवाय अनेक गुन्ह्यात जप्त केलेली वाहनेदेखील पोलिस चौकीत आणण्यात आलेली असतात. अशावेळी ती लावायची कुठे असा प्रश्‍न पोलिसांना पडतो.

कर्मचाऱ्यांना शौचालय सुद्धा नाही
गोडोली पोलिस चौकीला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाचा ताण आहेच पण नागोबाची धास्तीसुध्दा त्यातच त्यांना नैसर्गिक विधी करण्यासाठी साधे शौचालय सुद्धा नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे वरिष्ठांनी किमान या तरी गोष्टींकडे लक्ष द्यावे, एवढीच माफक अपेक्षा कर्मचाऱ्यांनी दै. प्रभातजवळ व्यक्त केली.

पोलिस पण माणुसच
पोलिस हा प्रामाणिकपणे काम करत असतोच पण त्यालाही काही अडचणी आहेत. रस्त्यावर काय झाले तर पोलिस तात्काळ यावा असे वाटते अन्‌ चौकीपण बंद नको आम्ही नेमके काय करावे? चौकीत खुप दिवसापासुन घोणस निघते पण अत्ता त्याला काय करावे ? असा उद्विग्न सवाल एका कर्मचाऱ्यांने उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
6 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)