‘स्मार्ट वॉच’चा प्रस्ताव “स्टॉप’

पिंपरी – सफाई कर्मचाऱ्यांवर देखरेखीसाठी “स्मार्ट वॉच’ सेवा तत्त्वावर घेणे तोट्याचे असल्यावर शिक्कामोर्तब करत स्थायी समितीने अखेर हा वादग्रस्त प्रस्ताव  फेटाळून लावला. या प्रस्तावाला विविध सामाजिक संघटनांसह, विरोधी पक्षांनीही तीव्र विरोध केला होता. त्यामुळे आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनाही दणका बसला आहे.

महापालिकेच्या रामचंद्र पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली. सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. आयुक्तांनी हा विषय स्थायी समितीसमोर मांडला होता. जानेवारी 2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण होणार असल्याने तातडीची बाब म्हणून “स्मार्ट वॉच’ थेट पद्धतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. काही सफाई कामगारांच्या कामचुकारपणामुळे सर्वच कामगारांवर ताशेरे ओढले जातात. त्यामुळे सर्व स्वच्छता कामगारांवर, आरोग्य निरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठी “स्मार्ट वॉच’ची मदत घेतली जाणार होती. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 4 हजार 544 नगांची खरेदी करण्याचे प्रस्तावित होते. यासाठी प्रत्येक “वॉच’साठी दरमहा 287 रुपये अधिक जीएसटी असा सुमारे 7 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार होता. या प्रस्तावानुसार सेवा तत्त्वावर घेतल्याने “वॉच’चा खर्च हा दुप्पटीने वाढणार होता. त्यापेक्षा ते खरेदी करणे महापालिकेला फायदेशीर ठरत असल्याचे सांगत स्थायी समिती सदस्यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. आयुक्तांच्या मतानुसार सफाई कर्मचाऱ्यांवर या “वॉच’मुळे नियंत्रण ठेवणे सोपे जाणार होते. तुर्तास महापालिकेकडे यंत्रणा नसल्याने “वॉच’ खरेदी करण्यापेक्षा ते सेवा तत्त्वावर घेणे फायदेशीर ठरेल, असा दावा त्यांनी केला होता. तसेच “स्मार्ट सिटी’मध्ये कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध यंत्रणा अंमलात येणार आहेत. त्यामुळे तुर्तास हे “वॉच’ सेवा तत्त्वावर घेण्याचा आयुक्‍तांचा आग्रह होता. मात्र त्यांनी जो “नागपूर पॅटर्न’ महापालिकेला सुचवला होता. त्या “वॉच’मध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे महापालिका 7 कोटी भरून देखील खरेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेऊ शकेल का याची काहीही शाश्‍वती नव्हती. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनाही यातून अंग काढून घेत हा विषय फेटाळला आहे.

“लेजर शो’साठी फेर निविदा
महापालिकेच्या वतीने बर्ड व्हॅली येथे “लेझर शो’ करण्याचे प्रस्तावित आहे. या कामासाठी तब्बल 9 कोटी 32 लाख 40 हजार 929 रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेसमोर प्रशासनाने सादर केला होता. हा प्रस्ताव महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे मांडण्यात आला होता. मात्र या प्रस्तावात व निविदेत त्रुटी असल्याचे सांगत हा विषय स्थायी समितीने फेटाळला. तसेच याबाबत फेर निविदा करण्याच्या सूचना स्थायी समितीने विद्युत विभागाला दिल्या आहेत.

64 कोटींच्या कामांना मंजुरी
स्थायी समितीच्या बैठकी समोर 70 कोटी 64 लाख 99 हजार रुपयांचे एकूण 71 विषय मांडण्यात आले होते. यातील 64 कोटी 21 लाख 5 हजार रुपयांच्या 50 विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये संतपीठ तसेच स्टॉर्म वॉटर लाईनच्या 1 कोटी 49 लाख 99 हजार रुपयांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. तर सुदर्शन चौक येथे ग्रेड सेपरेटर उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी 27 कोटी 86 लाख 93 हजार रुपये खर्चाच्या प्रस्तावासह एकूण 12 विषय तहकूब करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)