“स्मार्ट’ वाहतुकीसाठी 20 मार्ग

वाहतूक विभागाकडून सर्व्हे : सिग्नल सिंक्रोनायझेशसाठी स्मार्ट सिटीकडे प्रस्ताव

– गणेश राख

पुणे – शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी करून सुरळीत वाहतुकीसाठी पाऊले उचलण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून शहरातील मुख्य आणि वर्दळीच्या 20 मार्गांचा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवरील चौकांची संख्या, होणारी कोंडी, लागणाऱ्या वेळेचा प्राथमिक अभ्यास करून या मार्गांवरील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्याचे सूचवण्यात आले आहे. स्मार्ट सिटीच्या मदतीने हे काम करण्यात येणार असून तसा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून स्मार्ट सिटीला देण्यात आला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील 20 मार्गांवरून नागरिकांना जलद वाहतूक करता येणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीकडून संयुक्तपणे मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात काही मुख्य रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात असून ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सुरळीत वाहतूक नियोजनासाठी या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थित ठेवणे आवश्‍यक आहे. यासाठी अशा 20 मुख्य रस्त्यांची यादी वाहतूक विभागाने तयार केली असून त्याचा सर्व्हे करण्यात आला आहे. जास्त वर्दळ आणि गर्दीच्या रस्त्यांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. सर्व्हेदरम्यान रस्त्यांवर दुचाकीवरून प्रवास करत विशिष्ट अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, याचा अभ्यास करण्यात आला आहे. यासाठी सकाळ, सायंकाळी आणि पीक अवर्स अशा वेगवेगळ्या वेळी हा सर्व्हे करण्यात आला असून लागणाऱ्या वेळेची नोंद घेण्यात आली आहे. लागणारा वेळ, रस्ते, प्रमुख चौक याची माहिती संकलीत करून यासंदर्भातील अहवाल स्मार्ट सिटीकडे पाठवण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या मदतीने या रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनायझेशन करून वाहतुकीचा वेग वाढवण्यात येणार आहे.

…असा झाला सर्व्हे
वाहतूक पोलिसांकडून सकाळी तसेच गर्दीवेळी पीक अवर्समध्ये शहरातील रस्त्यांवर प्रत्यक्ष दुचाकीवरून हा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक करून विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेची नोंद घेण्यात आली आहे. तसेच, सुट्टीच्या दिवसाचीही नोंद घेण्यात आली आहे. यात काही ठिकाणी अगदी कमी अंतरासाठी जास्त वेळ लागल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशा रस्त्यांवर सिग्नल सिंक्रोनायझेशनची गरज व्यक्त केली आहे.

काय आहे सिग्नल सिंक्रोनायझेशन
प्रवासादरम्यान वेळेची बचत होऊन वेगाने वाहतूक होणे हा सिंक्रोनायझेशनचा मुख्य उद्देश आहे. एखाद्या रस्त्यावरून जात असताना रस्त्यातील चौकात पोहोचताक्षणी ग्रीन सिग्नल लागतो. यामुळे वाहनचालकांना कुठेही थांबावे लागत नसून वाहतुकीचा वेग वाढून सुरळीत वाहतूक होते. दरम्यान, शहरात एटीएमएस सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. मात्र, याला जास्त कालावधी लागणार असून सध्या मॅन्युअली टाईमींग सेट करून सिंक्रोनायझेशनचे काम तातडीने करण्यात येणार आहे.

सुरळीत वाहतुकीसाठी मुख्य रस्त्यांवर वेगाने वाहतूक होणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष दुचाकीवरून हा सर्व्हे करण्यात आला आहे. याचा अहवाल स्मार्ट सिटीकडे देण्यात आला असून यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक


स्मार्ट सिटीच्या मागील बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांनी शहरातील कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरात काही रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनायझेशन तातडीने करण्याचा निर्णय घेतला असून महापालिका आणि स्मार्ट सिटीच्यावतीने पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण केले जाईल.
– राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

या रस्त्यांवर होणार सिग्नल सिंक्रोनायझेशन
– कात्रज ते बोपोडी
– कर्वे पुतळा ते पुणे स्टेशन चौक
– पुणे स्टेशन चौक ते खराडी दर्गाह
– मगरपट्टा जंक्‍शन ते खराडी बायपास
– बोपोडी ते पुणे स्टेशन जूना हायवे
– विश्रांतवाडी चौक ते शाहदावल बाबा ते पाटील इस्टेट ते शिवाजीनगर
– खंडोजीबाबा चौक ते स्वारगेट
– सायकर चौक ते खान्या मारुती कॅम्प
– 509 चौक ते आरटीओ ते मनपा भवन
– रेजहिल्स ते एअरपोर्ट
– नांदेड सिटी ते स्वारगेट
– मनपा भवन ते ब्रेमेन चौक
– खान्या मारुती ते खडी मशीन चौक
– महेश सोसायटी ते जेधे चौक
– बोपोडी ते 15 नं. हडपसर (भैरोबानाला मार्गे)
– हडपसर ते सिमला ऑफिस चौक
– पौड फाटा ते पुणे विद्यापीठ
– 15 नं. हडपसर ते जेधे चौक
– एअरपोर्ट ते वारजे चौक
– जेधे चौक ते वारजे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)