“स्मार्ट’ या बिरुदापेक्षा शहवासीयांचे समाधान महत्त्वाचे!

डॉ. प्र. चिं. शेजवलकर : “टाटा उद्योग पुरस्कारा’चे वितरण
पिंपरी,  (प्रतिनिधी) – आपले शहर स्मार्ट करण्यासाठी आणि पर्यायाने परकीय गुंतवणूकवाढीसाठी रस्सीखेच सुरू आहे. “स्मार्ट सिटी’ हे खरं तर गौडबंगाल आहे. “स्मार्ट’ या बिरुदापेक्षा शहवासीयांचे समाधान पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, महाराष्ट्र राज्य विकास औद्योगिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष सुदाम मोरे, उपाध्यक्ष बाजीराव सातपुते, मनोहर पारळकर आदी उपस्थित होते.

डॉ. प्र. चिं. शेजवलकर म्हणाले की, शहर “स्मार्ट’ होताना शहरवासियांच्या प्राथमिक बाबींकडे डोळेझाक तर होत नाही ना हे पाहणे गरजेचे आहे. शहरात नवनव्या गोष्टी असाव्यात याची भूरळ पडण्यापेक्षा शहरवासियांना काय हवे आहे, याचा साधकबाधक विचार होणे आवश्‍यक आहे, असे सांगत शेजवलकर म्हणाले की, “स्मार्ट’ या बिरुदापेक्षा शहवासीयांचे आनंद, समाधान हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

खासदार अमर साबळे म्हणाले की, कामगार आपल्या उद्योजकांचा सत्कार या “टाटा’ पुरस्कार सोहळा कार्यक्रमाच्या माध्यमातून करतात ही कौतुकाची बाब आहे. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाचा सदस्य या नात्याने आपण ठिकठिकाणी फिरतो. कामगारांचे प्रश्न आजही भीषण आहेत. कामगारांना प्राथमिक सोयीसुविधा, पेन्शन, कौटुंबिक तसेच सामाजिक सुरक्षा यांचा अनेक ठिकाणी अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते, असे खासदार साबळे म्हणाले.

यावेळी “भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ ग्रॅप फायर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक गजानन चरपे यांना तर “उद्योग विभूषण पुरस्कार’ एक्‍सलंट डायीस ऍण्ड मोल्डसचे व्यवस्थापकीय संचालक मोहरसिंग वर्मा यांना प्रदान करण्यात आला.

“भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग भूषण पुरस्कार’ प्रेरणा किचन रॅक्‍सचे संचालक प्रवीण शिंदे, डायमंड इंडस्ट्रीजचे संचालक राघवेंद्र दलाल, “भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग सखी पुरस्कार’ मॅग्नाप्लास्ट टेक्‍नॉलॉजीजच्या व्यवस्थापकीय संचालक राजश्री गागरे, “उद्योग विकास पुरस्कार’ राज इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे संचालक राजेश पालवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरसेविका म्हणून निवडून आल्याबद्दल प्रियांका बारसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)