स्मार्ट नव्हे, ट्रॅफिक जॅम सिटी

मेट्रोच्या मार्गावर दररोज तीन बसेस बंद : वाहतूक पोलिसांची दमछाक

पुणे – “स्मार्ट सिटी’तील रस्त्यांवर वारंवार पीएमपी बस बंद पडत असल्यामुळे “स्मार्ट सिटी, ट्रॅफीक सिटी’ झाली आहे. त्यातच कर्वे रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रोच्या मार्गावर दररोज दोन ते तीन पीएमपी बसेस बंद पडत असल्यामुळे वाहतुकीचा “बट्टयाबोळ’ झाला असून, वाहतूक पोलिसांना ही कोंडी सोडविताना दमछाक होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीत, पीएमपी कधी स्मार्ट होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रस्त्याच्यामध्येच पीएमपी बस बंद पडणे, विशेषत: ऐन गर्दीच्या ठिकाणी आणि मुख्य मार्गावरच बस बंद हे पीएमपीची “खासीयत’ आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होवून, वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागतात. अशा परिस्थितीत ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या कर्वे रस्त्यावर दररोज सकाळ-संध्याकाळ ही कसरत पहायला मिळत आहे. कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने बॅरिगेट्‌स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. केवळ एक बस जाईल, एवढाच रस्ता वाहतुकीसाठी राहिला आहे. अशा परिस्थितीत एखादी रस्त्यामध्येच बंद पडली तर वाहतुकीचा “खेळखंडोबा’च होत आहे.

बुधवारी (दि. 24) सकाळी ऐन गर्दीच्या वेळी डेक्‍कनकडून एसएनडीटीकडे जाणाऱ्या मार्गावर नळस्टॉप येथे पीएमपी बस बंद पडली. त्यामुळे मागे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बस सुरू होत नसल्याचे लक्षात आल्यावर नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी बसला धक्‍का देत बस बाजूला घेतली. त्यानंतर कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी मोरे विद्यालय येथील एमआयटी स्टॉपजवळ पीएमपी बस बंद पडली होती. बंद पडलेली बस तत्काळ घेऊन जाण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून दिरंगाई होते. त्यामुळे ती बस तासन्‌तास त्याचठिकाणी उभी असते. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून, अखेर पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली. परंतू, तो रस्ताही अरूंद असल्यामुळे कोंडी वाढू लागली. त्यामुळे पोलिसांनी बसला धक्‍का देत बस बाजूला घेतली. हे “बंदसत्र’ दररोज सुरू असल्यामुळे पोलीस आणि वाहनचालकांनी डोकेदु:खी वाढली आहे.

बसेस दुरुस्त करून सोडा; डेपोला सूचना
बसेस दुरुस्त करूनच मार्गावर सोडण्यात याव्यात, अशा सूचना सर्व डेपो मॅनेजरला देण्यात आल्या आहेत. तसेच, चालकांना डाव्या बाजूने बस चालवण्याचे देखील सांगण्यात आले आहे. ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी पीएमपीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पीएमपी विभागातील जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

कर्वे रोड परिसरात मेट्रोचे काम सुरू असूून याठिकाणी वाहने बंद पडल्यास ती हलवण्यासाठी क्रेनची सोय करण्यात आली आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पीएमपीच्या बसेस जुन्या असल्याने त्या बंद पडतात. मात्र, क्रेनच्या सहाय्याने त्या हलवून वाहतूक सुरळीत केली जाते.
– प्रभाकर ढमाले, सहायक पोलीस आयुक्‍त, वाहतूक विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)