स्मार्ट गुंतवणूक, स्मार्ट परतावा (भाग-2)

दीर्घकालीन गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीने परतावा देते, त्याला म्हणतात कंपाऊंडिंग इन्व्हेस्टिंग. ती कशी काम करते आणि किती परतावा मिळवून देते, हे पाहूयात.

स्मार्ट गुंतवणूक, स्मार्ट परतावा (भाग-1)

आता ज्याला हे गमक कळेल तो त्यातून कमावतो व ज्याला हे उमगत नाही तो गमावतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशी केलेली गुंतवणूक ही दीर्घ मुदतीतच अनेकपट फायदा कमावून देते. यासाठी एक आख्यायिका आहे. एक राजा असतो, ज्याला आपल्या संपत्तीचा, राज्याचा, त्यामधील उत्पन्नाचा व स्वतःच्या बुद्धीमत्तेचा फार गर्व वजा अभिमान असतो. त्याला बुद्धिबळ खेळण्याचा फारच शौक असतो व तो बुद्धीबळाच्या खेळात समोरच्यास नेहमीच तुच्छ लेखत असतो. एकदा एक विद्वान व्यक्ती त्या राजाच्या राज्यात येते व राजाची भेट घेते. राजा त्या विद्वानाला नीच दाखवण्यासाठी त्यास बुद्धीबळ खेळण्याचे आवाहन करतो. तेव्हा ती व्यक्ती, राजास एक अट ठेवते. जर राजा बुद्धीबळाच्या डावात हरला तर राजाने बुद्धीबळातील पटावरील घरांच्या संख्येप्रमाणे धान्य दान द्यावं, फक्त यात अट अशी की, पहिल्या घरासाठी जर एक धान्याचा दाणा गृहीत धरला, तर दुसऱ्या घरासाठी मागील घरातील धान्याच्या दुप्पट धान्य द्यावं म्हणजे पहिल्या घरासाठी १ दाणा, दुसऱ्या घरासाठी २, तिसऱ्यासाठी ४, चौथ्यासाठी ८ दाणे व असंच संपूर्ण ६४ घरांसाठी करण्यात यावं. राजा तुच्छतेनं हसून त्याच्या फाजील आत्मविश्वासासमोर ही अट मान्य करतो. या वेळी राजा डाव हरतो व आपल्या सरदारांना विद्वानाची अट पूर्ण करण्यास सांगतो. जेव्हा ते ६४ व्या घरातील धान्याचा हिशोब करतात तेव्हा राजाच्या चेहरा खर्र्कन उतरतो कारण तो कफल्लक झालेला असतो कारण शेवटच्या घरासाठी धान्याच्या दाण्यांची संख्या असते, ९२२,३३,७२,०३,६८५, ४७,८०,०००. (नऊशे बावीस अब्ज तेहतीस कोटी बहात्तर लाख तीन हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी,सत्तेचाळीस लाख ऐंशी हजार). अगदी १० दाण्याचा १ ग्रॅम धरला तरी काही अब्ज किलो धान्य. तर अशी ही जादू आहे चक्रवाढीची.

अशाच प्रकारे आपणही आपली गुंतवणूक उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये करून आलेले लाभांश किंवा कमावलेला फायदा पुन्हा गुंतवून अशाच वाढीची अपेक्षा आपण दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकीच्या रकमेच्या बाबतीत देखील बाळगू शकतो. ज्याप्रमाणे प्रत्येक घरागणिक धान्य दुप्पट केलं गेलं त्याचप्रमाणे प्रत्येक तीन वर्षांत जर आपली गुंतवणूक दुप्पट झाली, तर आज २४ वर्षांच्या तरुणानं गुंतवलेले १ लाख रुपये, त्याच्या निवृत्तीपर्यंत ४० कोटी रुपयांच्या घरात जातील. म्हणूनच मागील लेखात नमूद केलेलं होतं की Invest Early. यासाठी ७२ चा नियम आपल्यास सांगू शकतो की किती वर्षांत तुमचे पैसे दुप्पट होतील. या ७२ संख्येला व्याजदराने भागलं की आलेलं उत्तर म्हणजे गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी लागणारी वर्षं. उदा. जर व्याजदर १२ % असेल तर ७२/१२ = ६, म्हणजेच तुमची गुंतवणूक ही पुढील ६ वर्षांत दुप्पट होऊ शकते. अशाप्रकारे, चक्रवाढ व्याज पद्धत ही आपल्यासाठी पैसे कमावण्याचं काम करते. हीच खरी मजा आहे दीर्घ मुदतीतील परताव्याची आणि म्हणूनच बहुतांशी गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडताना ग्रोथ पर्याय निवडतात, ज्यात गुंतवणुकीवरील परताव्याची त्याच योजनेमार्फत पुनर्गुंतवणूक होत असते व शेवटी आपल्यास चक्रवाढ व्याज मिळाल्याचा आनंद उपभोगता येतो.

मागील आठवड्यात बाजार हा तेजी व मंदीच्या हेलकाव्यांवर स्वार होत शेवटच्या दोन सत्रांत वधारला. आगामी आठवड्यासाठी निफ्टी ५० साठी, ११४०० ही उत्तम आधार पातळी असेल तर ११७४० च्या आसपास निफ्टीस प्रतिकार होऊ शकतो. पाहुयात की बाजार नक्की काय अनुभव देतोय ते !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)