स्मशानभूमी हीच अभ्यासाची जागा- पो.नि. शिळीमकर

अकोले – अभ्यासासाठी स्मशानभूमीइतकी शांत जागा दुसरी कोणतीच नव्हती, म्हणूच मी माझ्या शालेय जीवनातील अभ्यास बऱ्याचदा हा स्मशानभूमीत जाऊन करायचो. परिस्थिती अत्यंत बेताची होती. स्मशानभूमीतील अभ्यासाने माझ्या जीवनात कठोर परिश्रम व धाडसाचे बीजारोपण झाले. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आपल्या अनुभवांचे कथन करीत विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहित केले.

अकोले येथील अगस्ती एज्युकेशन सोसायटी आणि अगस्ती विद्यालयाच्या संयुक्‍त विद्यमाने अगस्ती विद्यालयाच्या 52 व्या गणेशोत्सवानिमित्ताने आयोजित संस्थेचे दिवंगत विश्‍वस्त गंगाधर काका नाईकवाडी स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना आणि “मी इन्स्पेक्‍टर झालो!’ या विषयावर शिळीमकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, संस्थेचे कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, मुख्याध्यापक ए. बी. आढाव, उपमुख्याध्यापक जी. पी. अभंग, पर्यवेक्षक सुरेश कोकणे उपस्थित होते.

जिल्हा नियोजन मंडळावर निवड झाल्याबद्दल जालिंदर वाकचौरे यांचा सत्कार संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी शिळीमकर म्हणाले, “”जीवनात आई-वडिलांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची शिदोरी असते. ही शिदोरी ज्याच्याजवळ असते तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती असतो. म्हणून आई-वडिलांना विसरू नका,” असे आवाहन त्यांनी केले. हे सांगताना त्यांनी आयुष्यात संघर्षाची तयारी ठेवा. वेळेचा सदुपयोग केल्यास जीवनाचे ध्येय आपण गाठू शकतो. जिद्द चिकाटी, वाचन, संयम याचे पालन करण्याचे आवाहन केले.
अकोले तालुक्‍यातील आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या जडणघडणीमध्ये अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे फार मोठे योगदान आहे. संस्थेच्या सर्वच शाळांचा 10 वीच्या निकालाचा दर्जाही टिकून आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक ब. ह. नाईकवाडी यांनी सुरू केलेले मिशन आजही सुरू असल्याचे वाकचौरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी उपमुख्याध्यापक अभंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)