स्मशानभूमींसाठी लवकरच धोरण ठरविणार

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या स्मशानभूमींसाठी लवकरच धोरण ठरविले जाणार आहे. याअंतर्गत पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, स्नानगृह, स्वच्छतागृह, दशक्रिया विधीसाठी चौथरे या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याकरिता लवकरच आयुक्त श्रावण हर्डीकर आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन शहरातील स्माशानभूमींचे धोरण ठरविले जाणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी सोमवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत दिली.

महापौर राहुल जाधव यांनी शहरातील विविध जाती-धर्मांच्या एकून 36 स्मशानभूमींना भेट देत, त्याठिकाणची पाहणी केली. या भेटीदरम्यान नागरिकांशी संवाद साधत, तसेच या स्मशानभूमींमध्ये भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शहरात विविध जाती-धर्मांच्या एकूण 36 स्मशानभूमी आहेत. महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांबरोबरच सर्वच स्मशानभूमी पत्र्याच्या शेडच्या आहेत. त्यामध्ये पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. अनेक स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नाही. तर पिण्याचे पाणी, स्नानगृह व दशक्रिया विधींसाठी चौथरे नाहीत. याशिवाय मुख्यरस्त्यापासून या स्मशानभूमी काही अंतरावर असल्याने, रस्तेदेखील अरुंद आहेत. दुख:द प्रसंगी स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर जाधव यांच्या या भेटीदरम्यान दापोडी येथील नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीची रचना सर्वात चांगली वाटली. तर लिंकरोडवरील ख्रिश्‍चन बांधवांच्या स्मशानभूमीतील स्वच्छतेचे महापौरांनी कौतुक केले. तर रावेतची स्मशानभूमी विकसित करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. अनेक स्मशानभूमींमध्ये रानझुडपे व गवत वाढले असल्याचे निरिक्षण महापौर जाधव यांनी नोंदविले.

प्रस्तावित धोरणातील संभाव्य बाबी
1) सर्व धर्मियांच्या स्मशानभूमींचे सुशोभिकरण
2) पत्राशेडऐवजी आरसीसी बांधकाम करणार
3) सर्व नागरी सोयी-सुविधा पुरविणार
3) अंत्यसंस्कारादरम्यान जळाऊ लाकडाचा वापर कमी करण्यासाठी यंत्रणा उभारणार
4) अंत्यसंस्कारादरम्यान प्रदूषण कमी होईल, यासाठी यंत्रणा उभारणार
4) स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते प्रशस्त करणार
5) जागेचा ताबा मिळविण्यासाठी संबंधितांना योग्य मोबदला देणार

समाविष्ट गावांमधील स्मशानभूमींची दूरवस्था असल्याचा अनुभव मी स्वत: चिखलीत घेतला आहे. पुरेशा सोयी-सुविधांअभावी मृताच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मी शहरातील स्मशानभूमींची पाहणी केली आहे. प्रत्येक मृत व्यक्‍तीवर प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार झाला पाहिजे, यासाठी शहरांमध्ये असलेल्या या स्मशानभूमींमध्ये आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्याबाबत लवकरच धोरण ठरविले जाणार आहे.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)