स्मरण : शब्दप्रभूला शब्दच नाठाळ होतात तेव्हा… 

शेखर कानेटकर 

अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्‍तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताद्बी वर्ष 8 नोव्हेंबर 2018 रोजी सुरू होत आहे. पु.लं.नी आयुष्यभर चित्रपट, नाटक, एकपात्री प्रयोग यातून शेकडो भूमिका केल्या. अगणित भाषणे गाजवली. पण कधीही त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही की, वार्तालाप केला नाही. पण 6 नोव्हेंबर 1998 रोजी पु.लं.नी पहिलाच वार्तालाप केला. त्याचे साक्षीदार होता आले, हे क्षण अनुभवता आले. त्या प्रसंगाचे हे स्मरण… 

दिनांक 8 नोव्हेंबर 1998 रोजी पुलं 80 व्या वर्षात पदार्पण करणार होते. यानिमित्त सर्वच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पुलंची मुलाखत हवी होती. पण “पार्किसन्स’ने बेजार असलेल्या पुलंना प्रत्येकाला स्वतंत्र भेटून मुलाखत देणे शक्‍य नव्हते. म्हणून मग पुलंचे वास्तव्य असलेल्या पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील “मालती-माधव’ इमारतीतच सर्व पत्रकारांना एकत्र बोलावून अनौपचारिक वार्तालापाचे आयोजन केले गेले.

“मालती-माधव’च्या पार्किंगमध्ये अर्धा तास हा अनौपचारिक कार्यक्रम झाला. अर्धी विजार, तलम शुभ्र बंडी, निळा स्वेटर, पायावर शाल पांघरलेली अशा वेषात पुलं व्हीलचेअरवर बसले होते. चेहराही प्रसन्न होता. पण शब्द उच्चारणे जड जात होते. विचार सलग मांडता येत नव्हते. याचा उल्लेख प्रारंभी करून पुलं म्हणाले, “मला जे सांगायचे आहे त्याच्या एक दशांशही मला मांडता येत नाहीये.’

आयुष्यात आपण विपुल लेखन केलेत. काय लिहायचे राहून गेले आहे असे वाटते, असे विचारले असता, त्यावर एकेकाळचा हा शब्दप्रभू क्षीण आवाजात म्हणाला, “पुष्कळ लिहावेसे वाटते. पण आता लिहिताना हात थरथरतो. दुसऱ्यास सांगून जमत नाही. आता विचारांची, शब्दांची सुसूत्रता राहात नाही. शब्दही नाठाळ झाले आहेत. हवे तसे ते येत नाहीत.’

“कंपवातामुळे लिहिणे, वाचणे बंद झाले आहे. आता फक्‍त श्रवणभक्‍ती चालू आहे,’ असे सांगताना पुलंनी आपल्याला मिष्किलपणा शाबूत असल्याचे दाखवून दिले. ते म्हणाले, “माझे लिहिणे बंद झाल्याने मात्र कोणाचेच नुकसान झालेले नाही.’

“आजारामुळे आपली स्मृती कमी झालेली आहे. टेपरेकॉर्डरसारखी गॅजेट्‌स (तांत्रिक उपकरणे) मला वापरता येत नाहीत, असे पुलंनी सांगतिले. त्यावर शेजारीच बसलेल्या सुनीताबाईंनी पुलंनी केलेली कोटी सांगितली. मी “नॉन गॅझेटेड’ आहे, असे पुलं म्हणाले होते.

“आवाजाएवढे मोलाचे काहीच नाही,’ असे पुलंनी नोंदवले. आजही त्याचे महत्त्व लक्षात येते. “नव्या मध्यमवर्गांशी आपण समरस होऊ शकलो नाही’, अशी कबुलीही त्यांनी बोलण्याच्या ओघात दिली होती. कंपवात, वार्धक्‍य याने जर्जर झाले असले तरी पुलंचा हजरजबाबीपणा, मार्मिकता व मिश्‍किलपणा शाबूत होता. त्यांच्या मोजक्‍याच बोलण्यातून वारंवार याचा अनुभव येत गेला. त्याची काही उदाहरणे-

ऐंशीव्या वर्षात पदार्पण करताना काय वाटते, असे विचारता पु. ल. म्हणाले, “प्रवेश वगैरे काही वाटत नाही. “सर्वे संतुरुटीनः’ अशीच स्थिती आहे. वार्तालापाच्या प्रारंभी पुलंनीच काही बोलावे अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली. त्यावर पु.लं.चे उत्तर होते- “फॉर ए चेंज आज तुम्हीच बोला.’ ब्रिटिश लेखक पी. जी. वुडहाऊस सोडला तर आपला आवडता लेखक कोणता, या प्रश्‍नावर पुलंचे हास्यकल्लोळात उत्तर, “बहुधा मलाच धरावे लागेल.’

लिखाण, वाचनबंद झाल्याने पुलं शेवटच्या काळात संगीताच्या ध्वनिफिती ऐकण्यात वेळ व्यतीत करत असत. नवीन संगीत ऐकता का, असे विचारता पुलं उत्तरले, “मी ऐकतो तेव्हा ते नवीनच असते.’ तब्येतीमुळे बाहेर गणे ऐकायला जाता येत नाही. त्यावर विचारणा झाली की, “घरीच मैफल का घडवत नाही? त्यावर पुलंचे उत्तेर “उगीच शेजाऱ्यांशी भांडण कशाला?’

वार्तालापाच्या आधी छायाचित्रकारांची छायाचित्रे काढण्याची लगबग सुरू होते. सुनीताबाईंना फोटो काढलेले आवडत नाहीत, फ्लॅशचा त्रास होतो, असे सांगत होत्या. त्या गडबडीत पुलं बोलून गेले, “हा फ्लॅश अवसानघातकी असतो. उडायला पाहिजे तेव्हा उडत नाही.’ समाजातील वर्तमान वातावरण, एकूण स्थिती याबाबत पुलंना प्रतिक्रिया विचारली गेली. त्यावर पुलं शब्दांची जुळवाजुळव करू लागलेले दिसले. “पूर्वी मरणाची भीती वाटायची आता जगायची भीती वाटते,’ या त्यांच्या विधानाची आठवण त्यांना पत्रकारांनी करून देताच ते गंभीर झाल्याचे दिसले. त्यांना बोलणे, व्यक्त होणे आणखीनच अवघड जात असल्याची जाणीव सर्वांनाच झाली.

शेवटी पत्रकारांनीही उत्तराचा आग्रह धरला नाही. आणि आता शब्द नाठाळ झालेल्या या शब्दप्रभूचा पहिलावहिला वार्तालाप संपला. महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्‍तिमत्त्वाचं हेच बहुधा अखेरचे सार्वजनिक दर्शन. त्यानंतर आजार बळावत गेला आणि या “खेळिया’ने, “आनंदयात्री’ने 12 जून 2000 या आपल्या विवाहाच्या वाढदिवशीच या जगाचा निरोप घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)