स्मरण: वर्ष बदलते, कॅलेंडर बदलते, आणि आपणही बदलतो…

योगिता जगदाळे

कालच अठरावे सरले आणि एकोणिसावे सुरू झाले. हे मी वर्षाबद्दल बोलत आहे. वर्षा म्हणजे कोणी मुलगी नव्हे, वर्ष-वर्ष! सन, साल, इंग्रजीत ज्याला आपण इयर म्हणतो ते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2018 संपले आणि 2019 सुरू झाले. खरं तर अठरावे वर्ष कधी संपले याचा पत्ताच लागला नाही. कोणत्या वर्षाचा जाताना पत्ता लागतो हा एक प्रश्‍नच आहे. आले वर्ष. . . गेले वर्ष असे गेले पस्तीस वर्षे चालू आहे. म्हणजे मी आता पस्तीशीची झाले हा सांगण्याचा हेतू.

मागे वळून पाहू लागले, तर दर वर्षी वर्ष संपतानाच्या भावना वेगवेगळ्या असायच्या. अगदी लहानपणी म्हणजे शाळेत जायला लागेपर्यंत सगळी वर्षे सारखीच वाटायची. त्यात काय नवीन असणार? लहानपणचे निर्व्याज, खेळकर, अल्लड जीवन. तेव्हा आजचे जगणे हे खरे जगणे होते. ना कालचा विचार ना उद्याची चिंता, उद्याची कशाला, तेव्हा कसलीच चिंता नसायची. खायचे-प्यायचे, खेळायचे, भावंडांशी मधूनमधून भांडायचे, त्यांच्या कागाळ्या घेऊन आजीकडे जायचे यात मोठा आनंद होता. तेव्हा फक्त आजच्या दिवसाचाच विचार होता. कालचाही नाही आणि उद्याचाही नाही. वाटते, ते दिवस किती छान होते. फुलपाखरांसारखे. पटकन उडून गेले.

मग शाळा सुरू झाली. वेळेचा हिशोब सुरू झाला. टाईम टेबल, अभ्यास मागे लागला. नव्या वर्षापेक्षा शाळा सुरू होण्याचा दिवस आणि जून महिना महत्त्वाचा वाटू लागला. परीक्षेचे महिने, तारखा लक्षात राहू लागले, ठेवावे लागायचे, विसरायचे म्हटले तरी विसरणे शक्‍य नसायचे. पण तेही दिवस गेले.

कॉलेज आले. शिक्षण झाले, नोकरी सुरू झाली. आणि एक तारखेचे महत्त्व जाणवू लागले. पगाराची तारीख-एक तारीख. तेव्हा मिळणारा सातशे रुपये पगार केवढा मोठा वाटायचा. पुढे जगरहाटीप्रमाणे संसार सुरू झाला. इथे मात्र कॅलेंडर एकदम बदलले. आजवर कॅलेंडरवरील तारखा, वार, महिने यापेक्षा त्यावरील चित्रे किंवा मागील बाजूला असलेली माहिती याकडे लक्ष जायचे. आता मात्र तारीख वार आणि रोजचा दिवस-अगदी घटका-पळे म्हणतात तीही मोलाची वाटू लागली. वेळ पुरेनासा झाला. आता कॅलेंडरचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होऊ लागला. रोजच्या दुधाच्या नोंदीपासून ते गॅस, जाणेयेणे, खरेदी…करायची कामे आदी अनेक गोष्टी कॅलेंडरवर नोंदल्या जाऊ लागल्या. सारी संसारीपणाची लक्षणे.
आर्ट पेपरवरील आकर्षक चित्रे असलेल्या कॅलेंडरपेक्षा विविध उपयुक्त माहिती असलेली कॅलेंडरे हवीशी वाटू लागली. जुनी कॅलेंडरे वर्ष संपले तरी तशीच खिळ्याला राहू लागली.

पूर्वीचे खेळकर, हसरे, मजेचे दिवस आता काहीसे बोजड, चिंतेचे बनू लागले आहेत. चिंता काही खास असते, वा मोठी असते असे नाही. कसलीही असते, आज भाजी काय करावी, मुलीला डबा काय द्यावा, इथपासून ते आजीला दवाखान्यात न्यायला पाहिजे अशा अनेक प्रकारच्या काळज्या मागे येतात, न बोलावता येतात. सोबत चालत राहतात.त्यांचीही सवय होऊन गेली आहे.

आता नवीन वर्ष सुरू झाले, की जाणवत्ते, की केवल कॅलेंडरच बदलत नाही., तर आपण सारेच बदलतो. जाणवत नाही. पण निरंतर बदल होत असतात. कधी अचानक जणवते, की अरे! हे सारे किती बदलले आहे. आपले गाव सुटले, शहरात आलो. शाळासोबती, नातेवाईक जवळ राहिले नाहीत. अनोळखी माणसे इतकी आपली झाली आहेत, की ती कधी अनोळखी होती यावर विश्‍वासही बसत नाही. आणि हे सारे कळत नकळत होत गेले.

मी लहान होते, माझी आई तरुण होती. उत्साही होती. हौशी होती. आता माझी मुलगी लहान आहे. मी तरुण आहे आणि माझी आई मात्र म्हातारी झाली आहे. थकली आहे. हे सारे बदल दरवर्षी कॅलेंडर बदलता बदलता घडून आलेले आहेत. वेळच्या वेळी जाणवले नाहीत. पण मागे वळून पाहिले, की सारे जाणवू लागते. उरात कोठेतरी थोडीशी कळ उमटते.
आज शाळेत जाणारी माझी मुलगी उद्या मोठी होऊन कॉलेजात जाईल, शिक्षण पूर्ण करून नोकरीव्यवसाय करील, विवाह करून संसार थाटील. आज लहान असलेली ती मोठी होईल तेव्हा मी म्हातारी झालेली असेन. नातीकडे कौतुकाने पाहत असेन. कॅलेंडरे बदलतात, तसे आपणही बदलत जातो. बदल स्वीकारला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)