#स्मरण :भावी कोणीतरी…

योगिता जगदाळे

परवा बसमधून जात होते. डेक्‍कन चौकात सिग्नलला बस थांबली. डेक्‍कनला थांबण्याचा कधीही कंटाळा येत नाही.आजूबाजूला पाहण्यासारखे खूप काही असते. परवा पाहिले, तर एक छोटा मुलगा, त्याच्या हाती एक फडके होते. तो समोर दिसणारी स्कूटर, मोटर सायकल, कार अगदी उत्साहाने पुसत होता. पुसून झाली, की तिच्या मालकापुढे हसून हात पुढे करत होता. त्याने खुशीने काही पैसे दिले तर घेत होता. नाही तर पुढची गाडी पुसायला जात होता. सिग्नलला बस उभी होती त्या वेळात पाहिले, की त्याला फार कोणी नाराज करत नव्हते. दोनपाच रुपये देतच होते, ते पाहून मलाही बरे वाटले. भीक मागण्यापेक्षा काही तरी काम करणे बरे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नळ चौकातही एक असाच छोटा मुलगा असतो नेहमी. त्याच्या डोक्‍यावर एक टोपी असते. टोपीला लांब दोरीला बांधलेला एक गोंडा असतो. का पोरगा मोठा चुणचुणीतत आहे.. तो टाळी वाजवतो आणि डोके हलवायला सुरुवात करतो. आणि गमतीची गोष्ट म्हणे तो गोंडा त्याच्या डोक्‍याभोवती गरगरा फिरू लागतो. पाहायला मोठी गंमत वाटते. तो परत टाळी वाजवतो आणि गोंडा फिरण्यची दिशा बदलतो. सात आठ वर्षाच्या त्या मुलाच्या नाकाखाली चांगली तलवार कट मिशी आहे. अर्थात रंगाने काढ्‌लेली.. त्याच्याबरोबर त्याची 3-4 वर्षांची बहीण आणि आई असते,. आईच्या हाती एक ढोलकी असते ती वाजवत असते, ती. मात्र तिच्या वाजवण्याचा अन याच्या टोपी फिरण्याचा काही संबंध नसतो. या मुलालाही जाणारे येणारे पैसे देत असतात.

डेक्‍कनला पुस्तके व खेळणी विकणारी अनेक मुले मुली असतात. त्यातील काही हा व्यवसाय करून शाळा शिकत असतात, घरात हातभार लावत असतात;. खरं तर अशा मुलांकडून काही खरेदी करणे गरजेचे आहे. पण मॉल्समध्ये हजारांच्या वस्तू घेताना पाच पैसेही कमी न करणारे या मुलांकडून एक तर खरेदी करत नाहीत आणि चुकून वस्तू घेताना पन्नासची वस्तू एकदम दहा पंधराला मागतात. खरं तर गरज म्हणून नसली तरी मदतीच्या भावनेने अशा मुलांकडून काही खरेदी करावी.

मला विश्‍वास नांगरे पाटलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली.
एकदा विश्‍वास नांगरे पाटील पुण्यालाच येत असताना एका ढाब्यावर थांबले होते. चहापान झाल्यावर बाहेर पडले, तर एक मुलगा त्यांच्याभोवती रेंगाळत होता. , काय पाहिजे? त्यांनी विचारले. पैसे? त्याने नकार दिला. खायला? त्याने परत मान हलवली. मग काय हवे?

पेनाची नळी (रिफिल) तो म्हणाला. नांगरे पाटलाना नवल वाटले. तू माझ्याकडेच का मागितलीस. त्यांनी विचारले.
कारण तुमच्या खिशाला पेन आहे. तो म्हणाला. बाकी बरचे जण टी शर्ट घातलेले होते, आणि शर्टवाल्यांच्या खिशालाही पेनं नव्हती. त्या मुलाला पैसे नको होते. रिफिलच हवी होती. त्याच्या पेनातील रिफिल संपली होती. तो शिकत होता. अभ्यासू होता. त्यांना बरे वाटले.
तू मोठेपणी कोण होणार? त्यांनी विचारले.

फौजदार-त्याचे उत्तर आले. विश्‍वास नांगरे पाटलांनी त्या भावी फौजदाराच्या खिशाला आपल्या खिशातले भारी पेन काढूक्‍न लावले आणि त्या भावी फौजदाराशी शेकहॅंड करून ते आपल्या गाडीत बसले.
त्यांना त्या मुलात भावी फौजदार दिसला, या डेक्कनवरच्या काम करून शिकणाऱ्या मुलांतही असा कोणी तरी भावी असेल. त्याला मदत व्हायला पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)