स्मरण ‘जॉर्ज फर्नांडिस : बेधडक आणि बेदरकार’

हेमंत देसाई

आज देशातील कामगार चळवळ जवळपास मोडून पडली असतानाच, कामगारांचा अनभिषिक्‍त सम्राट जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन होणे हे आणखीनच टोचणारे आहे. नुकताच ज्या शशांक राव यांनी यशस्वीपणे बेस्टचा संप पार पाडला, त्यांचे वडील शरद राव हे जॉर्ज फर्नांडिस यांचे शिष्योत्तम. मुंबईतील टॅक्‍सी, फेरीवाले, महापालिका कर्मचारी अशा सर्वांच्या संघटना जॉर्जने मजबूतपणे बांधल्या आणि “नाहीरे’ वर्गास आवाज मिळवून दिला.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचे प्राथमिक अधिकारही नाकारण्यात येत होते, ती परिस्थिती जॉर्जने आरपार बदलली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज यांची पुढे दोस्ती झाली असली, आणि “मातोश्री’वर जाऊन ते बाळासाहेबांशी केव्हाही गप्पा मारत असले, तरी मागचा इतिहास विसरणे कोणालाच शक्‍य नाही. व्यक्‍तिगत संबंध जिव्हाळ्याचे असले, तरी शिवसेनाप्रमुख आणि जॉर्ज यांच्या विचारसरणीत जमीन-अस्मानाचा फरक होता.
मुंबईवर स. का. ऊर्फ सदोबा पाटील यांचे राज्य होते, तेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस जॉर्जने केले. त्यावेळी मुंबईतील पाणीप्रश्‍नावरून जॉर्जने सदोबांविरुद्ध तोफ डागली आणि त्यांचा पराभव केला. त्यावेळी “सकां’ना लोकसभेत विजयी करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पूर्ण मदत केली. जॉर्जना पराभूत करण्याचे त्यांनी ठरवले होते. कारण फर्नांडिस समाजवादी होते आणि कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. तर “कॉ. कृष्ण मेनन, आचार्य अत्रे, कॉ. डांगे, एच. आर. गोखले आणि जॉर्ज ही पंचमहाभूते गाडा’, असा नारा बाळासाहेबांनी तेव्हा दिला होता. त्यावेळी तिकीट न मिळाल्यामुळे कॉ. मेनन यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात ईशान्य मुंबईतून स. गो. बर्वे हे कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. मेनन यांच्यासाठी अत्रे जोरदार प्रचार करत होते आणि शिवसेना या “दाक्षिणात्य लालाभाई’ला पराभूत करण्यासाठी बर्वे यांच्या मागे उभी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाळासाहेबांच्या “मार्मिक’मध्ये एका व्यंगचित्रात केविलवाण्या स्थितीतील भारतमाता आणि तिच्यासमोर जॉर्ज, अत्रे, डांगे प्रभृती उभे होते. “…हे पेंढारी भारतमातेचा लिलावच करणार तर!’, अशा आशयाचा मजकूरही सोबत होता. त्यावेळी बाळासाहेबांच्या घरावर जॉर्ज व अत्रे यांच्या समर्थकांनी मोर्चाही नेला होता. स. का. पाटलांविरोधात जॉर्ज उभे असताना, प्रचाराच्या वेळी शिवसैनिकांनी हिंसक मार्गाचाही अवलंब केला होता. जॉर्ज मनाने इतके मोठे होते की, पुढे “माझा मित्र बाळ आता देशाचा हिंदूहृदयसम्राट झाला आहे’, असे कौतुकमिश्रित उद्‌गारही त्यांनी काढले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात जॉर्ज फर्नांडिस हे भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले, हे त्यांच्या असंख्य समर्थकांना बिलकुल रुचले नाही. राम मनोहर लोहिया यांच्या गैरकॉंग्रेसवादी राजकारणामुळेच जनसंघ-भाजपशी दोस्ती करून, देशातील हिंदुत्ववादी प्रवृत्तींना बळकट करण्याचे काम झाले, हे खरेच आहे.

वर्ष 1967 मधील बाळासाहेबांचा पवित्रा हा शिवसेनेतीलच अनेकांना पटला नव्हता. जॉर्जने जो ऐतिहासिक रेल्वे संप केला, तो अर्थातच देशव्यापी होता. अवघ्या देशाची रेल्वे बंद पाडण्यासाठी किमान तीन दिवस तरी रेल्वे बंद करणे आवश्‍यक होते. परंतु जॉर्जने 20 दिवस रेल्वे बंद पाडली. त्यामुळे देशाचे अर्थचक्र थांबल्यासारखे झाले. रेल्वे व्यवस्था बंद करणे योग्य की अयोग्य, असा सवाल जरूर करता येईल. पण त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्धचा असंतोष अधिक तीव्र झाला, हे नाकारता येणार नाही.

आणीबाणीच्या काळात काही पुढाऱ्यांना केंद्र सरकारने ताबडतोब पकडले. पण मृणाल गोरे, जगन्नाथ जाधव, जॉर्ज फर्नांडिस, पन्नालाल सुराणा असे अनेकजण भूमिगत राहिले होते. त्यांनी बरेच दिवस पोलिसांना चुकवले. जॉर्जसारखा नेता बराच काळ भूमिगत राहू शकला, हीच त्यांच्या तेव्हापर्यंतच्या कार्याची पावती जनतेने दिली होती. इंदिरा गांधींनी 1977 च्या जानेवारीत निवडणुका जाहीर केल्या. आणीबाणी न उठवताच मार्चमध्ये निवडणुका पार पडल्या. जॉर्ज फर्नांडिस तर तुरुंगामधूनच निवडणूक लढवत आहेत, हा तेव्हा प्रचाराचा मुद्दा करण्यात आला होता. आणीबाणी संपली. जयप्रकाश नारायण अर्थात जेपींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र आले. जनतेने भरघोस मते देऊन जनता पक्षाला (निवडणूक चिन्ह होते नांगरधारी शेतकरी) निवडून दिले. पण नंतर कुरबुरी सुरू झाल्या. अगदी ऐनवेळी जनता सरकारलाच आव्हान दिले गेले. तेव्हा जॉर्जने केवळ 16 तासांच्या फरकाने दोन परस्परविरोधी भाषणे लोकसभेत ठोकली, हेही विसरता येणार नाही.

डॉ. लोहिया आणि मधु लिमये यांच्या छत्रछायेखाली काम करणारे शरद यादव, रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडिस यांच्या निष्ठांच्या परिवर्तनात आणीबाणीचा वाटा मोठा आहे. मात्र, जॉर्जसारख्या नेत्याने धर्मवादी शक्‍तींशी तडजोड का केली, हे अनाकलनीय आहे.

जॉर्ज हा इतर अनेक समाजवादी नेत्यांप्रमाणे मवाळ नव्हता. त्यामुळे सरकार उलथवून पाडण्यासाठी डायमानाइटचा वापर करणे, रेल्वे रूळ उखडणे यासारख्या हिंसक मार्गांचाही त्यांनी अवलंब केला. आणीबाणीत वर्ष 1976 मध्ये भूमिगत जॉर्जला अटक झाली. तेव्हा बेड्या ठोकलेल्या जॉर्जनी लोकांना वद्देशून अभिवादन केले, ती प्रतिमा आजही माझ्या डोळ्यांसमोर तरळत आहे. जनता सरकारात उद्योगमंत्री असताना, आयबीएम व कोकाकोलासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशातून हाकलून लावण्याचे पाऊल जॉर्जनी उचलले आणि “77′ नावाचे पर्यायी शीतपेय बाजारात आणले. जॉर्जचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असला, तरी त्यामुळे त्या काळात डाव्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, हे नक्की.

कोकण रेल्वे साकारण्यात मधु दंडवतेंबरोबर जॉर्जचीही कामगिरी मोलाची आहे. मी मुंबईतील आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये नोकरीला असताना, जॉर्जला कुडता पायजमा या नेहमीच्या वेशभूषेत येऊन संपादकीय वर्गाशी गप्पा मारत असल्याचे अनुभवले आहे. आपुलकीतून बहुतेकजण जॉर्ज यांचा एकेरीच उल्लेख करत.

समाजवादी विचारांचे आमचे तेव्हाचे मुख्य वार्ताहर दिनू रणदिवे यांच्याशी जॉर्जची खूपच दोस्ती होती. जॉर्ज जाहीर सभांना हजेरी लावे, तेव्हा तो एकदम व्यासपीठावर दाखल न होता, समोरच्या गर्दीमधून व्यासपीठाच्या दिशेने येत असे. अनेक भाषा येत असल्यामुळे आणि सुरुवातीच्या काळात मुंबईत फूटपाथवर दिवस काढले असल्यामुळे जॉर्ज सर्वसामान्य कामगार व शोषित-वंचितांशी एकरूप होऊन गेला होता. त्यावेळी दुकानदारी करणारे कामगार नेते नव्हते. आपल्या एसी घरात बसून अनुयायांना आदेश द्यायचे, शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवायचा आणि
स्वतःच्या मुलाबाळांची पंचतारांकित लग्ने करायची, हा प्रकार नव्हता. 1950, 60 व 70 च्या दशकात उद्योगपती नव्हेत, तर कामगार नेते हे समाजाचे हिरो होते. अशा हिरोंचा बेधडक, बेदरकार आणि धडाकेबाज सुपरहिरो म्हणजे जॉर्ज फर्नांडिस. त्यांच्या जाण्याने आपण सर्वचजण एका धडाडीच्या आणि बेदरकार नेत्याला मुकलो आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)