#स्मरण: गदिमांची जन्मशताब्दी 

व्यंकटेश लिंबकर 
“आधुनिक वाल्मिकी’ या सार्थ नावाने गणले गेलेले कवी, लेखक, कथाकार, निर्माता, अभिनेता “पद्मश्री’ विजेते गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा यांचे जन्मशताब्दी वर्ष आज दि. 1 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहे. पुण्यातील मुंबई-पुणे रस्त्यावरील “पंचवटी’ या निवासस्थानी आपल्या जीवनाचा बराच काळ व्यतीत केलेले गदिमा मूळचे सातारा जिल्ह्याच्या माणदेशातले. त्यांचा जन्म 1 ऑक्‍टोबर 1919 रोजी आजच्या सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्‍यातील शेटफळे या गावी झाला. ग्वाल्हेर येथील सन 1969 मधील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आणि सन 1973 मधील यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. नाट्य आणि साहित्य संमेलन अशा दोन्ही अध्यक्षपदी विराजमान होण्याचा दुर्मिळ मान त्यांनी मिळवला होता.
गदिमांची गीते, कथा आणि अन्य साहित्य लक्षणीय तर आहेच. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या “गीत रामायणा’च्या लेखनाने. आकाशवाणीसाठी तयार केलेल्या या कार्यक्रमाने गदिमांसह सुधीर फडके आणि सर्वच सहभागी गायकांसाठी तो अनमोल असा आयुष्याचा ठेवाच ठरला.
माडगुळकरांचे माडगुळे हे गाव मूळ गाव आणि शेटफळे हे जन्मगाव तत्कालीन औंध संस्थानचा भाग होते. लोककल्याणकारी राजा श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी हे कलाप्रेमी राजे होते. ते स्वत: उत्तम चित्रकारही होते. आरोग्यासाठी सूर्यनमस्काराच्या संकल्पनेचे प्रवर्तक असलेल्या या राजाने चितारलेली रामायणातल्या विविध प्रसंगांची विशाल चित्रे आजही औंध गावातील श्री यमाई मंदिरात पाहायला मिळतात. गदिमा एकदा औंधला गेले असता त्यांनी ही चित्रे पाहिली आणि त्या प्रत्येक चित्राखाली लिहिलेली चित्रवर्णने वाचली. ही चित्रे पहात असतानाच, अशाच रामायणातील प्रसंगांना आपण गीतरुपातून व्यक्‍त करावे, असे गदिमांनी ठरवले. आणि त्यातूनच निर्माण झाले, ते “गीत रामायण’ अजरामर ठरले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)