स्मरण : इंदिराजींचे आदरातिथ्य

रमेश दिघे 

अतिथी देवो भव. दारात आलेल्या अतिथीचे देव मानून स्वागत करायला आमची संस्कृती शिकवते. तिचे तंतोतंत पालन इंदिरा गांधींनी आयुष्यभर केले. आलेल्या पाहुण्याला भारतातील प्रांतोप्रांतीचे पदार्थ खायला मिळावेत म्हणून त्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ स्वतः शिकून घेतले. असे करताना त्यांनी आपण कोणाकडून काय शिकतो याचा विचार कधी केला नाही. त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरू अलाहाबादचे प्रख्यात कायदे पंडित होते.

गडगंज श्रीमंत असलेल्या मोतीलाल यांच्या “आनंदभवन’ या प्रचंड विस्तीर्ण बंगल्यात मोठा बगीचा, पोहण्याचा तलाव, मुलांसाठी घोडेस्वारीची जागा, टेनिस कोर्ट, अशा सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा असूनही छोट्या “इंदू’चे मन त्यात रमायचे नाही. ती कायम नोकरा-चाकरांशी बोलण्यात मग्न असायची. देशी आणि पाश्‍चात्य पदार्थांसाठी दोन वेगवेगळी स्वयंपाकघरे त्यांच्याकडे होती. तिथेच इंदूचा जास्त वावर असायचा.

सतत पाहुण्यांनी गजबजलेल्या आनंदभवनमध्ये अनेक तऱ्हेचे पदार्थ तयार केले जायचे. त्याचे बारीक निरीक्षण इंदू करायची. इथेच एका दक्षिणेकडील नोकराणीकडून तिने दाक्षिणात्य पदार्थ शिकून घेतले. गोवेकर स्वयंपाकिणीने तिला पोर्तुगीज पदार्थ शिकवले. घरी येणाऱ्या भाजीवाल्याशी गप्पा करून तिने भाज्यांची माहिती मिळवली. याप्रकारे आपल्या उमलत्या वयात इंदिरा पाककला कुशल झाली.

कमला नेहरू यांच्या अकाली निधनानंतर जवाहरलाल यांची देखभाल करण्याची जबाबदारी इंदिरेने स्वीकारली. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळ ऐन जोशात आलेली होती. चळवळीतील भूमिगत कार्यकर्त्यांना आनंदभवनमध्ये आश्रय दिला जायचा. असेच एकदा कॉंग्रेसचे नेते लालबहादूर शास्त्री यांना आनंदभवनच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत इंदिरेने लपवून ठेवले.

मोतीलाल, जवाहरलाल दोघेही बाहेर तुरुंगात असल्याने त्यांच्या देखभालीची जबाबदारी इंदिरेने स्वीकारली. शास्त्रीजींचा नाश्‍ता-जेवण त्या स्वतः त्यांच्या खोलीत घेऊन जात. खाणे-पिणे होईपर्यंत त्या तिथेच बसून राहात. याबाबत इंदिरेने एवढी गुप्तता पाळली की आनंदभवनमधला “खास’ पाहुणा कोण आहे हे पहाऱ्यावरील पोलिसांनाही समजले नाही!

नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर व त्याच्याआधी कमला नेहरू यांच्या दुखण्यावर इलाज करण्यासाठी त्यांना जगभर फिरावे लागले. या भ्रमंतीत एखादा लक्षणीय पदार्थ त्यांच्या खाण्यात आल्यानंतर तेथील आचाऱ्याला भेटून त्या पदार्थांची पाककृती लिहून घेत.

मायदेशी परतल्यावर ते पदार्थ नेहरू इथल्या स्वयंपाक्‍यांना करायला लावत. अशा वेळी इंदिराजी त्यांची मदत करत. एकाच वेळी नोकरचाकरांना धीर द्यायचा त्याचबरोबर पदार्थ उत्तमच होईल याची काळजी त्या घेत. पं. नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत आणि पुढील काळात स्वतः पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान निवासात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आदरातिथ्य नीट होतंय की नाही यावर इंदिरा गांधी यांचे बारीक लक्ष असायचे.

रात्रीच्या भोजनाचा मेनू त्या ठरवायच्या. हिंदू गोमांस खात नाहीत, मुस्लिमांना डुकराचे मटण वर्ज्य आहे, इथपासून शाकाहारी-मांसाहारी वेगवेगळ्या टेबलांवर बसतील. त्यांची वाढण्याची भांडी वेगळी असतील याची खबरदारी घेतली जायची. पाहुणा विदेशातील असेल तर त्या देशातील एखादा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ तयार केला जायचा.

पंतप्रधान म्हणून परदेश दौऱ्यावर असताना आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी इंदिराजी जाणून घ्यायच्या. त्या बाबतीत कोणाची आबाळ होत नाही ना, यावर त्यांचे लक्ष असायचे. एकदा आखाती देशांच्या दौऱ्यावर त्यांचे माहितीविषयक सल्लागार शारदा प्रसाद त्यांच्या समवेत होते. ते कट्टर शाकाहारी. एके ठिकाणी यजमानांनी पूर्ण मांसाहारी पदार्थांच्या भोजनाचे आयोजन केले होते.

तेव्हा इंदिराजींनी एका सहकाऱ्याला पाठवून शारदा प्रसाद यांची विचारपूस केली. “ते दहीभात मोठ्या मजेत खात आहेत.’ असे त्या सहकाऱ्याने सांगताच इंदिराजींचा जीव भांड्यात पडला! काही वेळेला आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचा भाग म्हणून परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांना रात्रीच्या मेजवानीचे आयोजन करावे लागते. अशा प्रसंगी बरोबरचे केंद्रीय मंत्री सरकारी नोकरशहा हे फक्त भारतीय बड्या पाहुण्यांशी संवाद करत.

शेजारी बसलेल्या विदेशी पाहुण्यांकडे त्यांचे लक्ष नसायचे, याची जाण असलेल्या इंदिराजी दौऱ्यावर निघण्याआधीच त्या देशातील भारतीय दूतवासांना सविस्तर पत्र पाठवून योग्य त्या सूचना देत. विशेष करून कोणत्या पाहुण्याशेजारी कोणाला बसवायचे याचे मार्गदर्शन त्यात असायचे. काही वेळेला राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून बैठकीची व्यवस्था केली जायची. मेजवानी प्रसंगी एकमेकांशी काय संवाद करायचा हेही ठरायचे.

शिष्टाचार म्हणून परदेशी राष्ट्रप्रमुखांसमवेत ते वाईनचा चषक उंचवायच्या; परंतु प्रत्यक्षात फळांचा रसच घ्यायच्या. इंदिराजी स्वतः मद्यपान करायच्या नाहीतच, पण इतर सहकाऱ्यांपैकी कोणी अतिमद्यपान करताना आढळल्यास आपली नापसंती संबंधितापर्यंत त्या व्यवस्थित पोहोचवायच्या.

“जाणिजे यज्ञ कर्म’ अर्थात जेवण हे एक धार्मिक कृत्य आहे असे समजून तू जेव याची जाणीव इंदिराजी स्वतः ठेवायच्या व इतरांनाही विसरू द्यायच्या नाहीत. “अन्न हे परब्रह्म’ असे मानून इंदिराजी जगभरातील कोणत्याही पदार्थाचा आस्वाद आनंदाने घ्यायच्या. इतरांनाही भरभरून खायला घालायच्या. “अन्नदाता सुखी भव’ असा आशीर्वाद देऊनच त्यांच्याकडचा अतिथी तृप्त व्हायचा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)