स्मरण: अमेरिकेचा मवाळ रिपब्लिकन

हेमंत देसाई

अमेरिकेचे चार वर्षे अध्यक्ष, आठ वर्षे उपाध्यक्ष, सीआयएचे प्रमुख आणि चीनमधील अमेरिकेचे राजदूत अशा अत्यंत महत्त्वाच्या पदांवर ज्यांनी काम केले, ते अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या निधनामुळे एका मोठ्या कालखंडाची समाप्ती झाली आहे. त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा घेतलेला वेध…

दहशतवादविरोधी जागतिक आघाडी निर्माण करणारे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचे ते पिताजी. अर्थात दोघेही रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असले, तरी त्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता. वडील हे रिपब्लिकनमधील उदारमतवादी, तर चिरंजीव हे उजवे. थोरले बुश इतके नेमस्त वृत्तीचे होते की, अमेरिकेचे विद्यमान अधयक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या असहिष्णू धोरणांना त्यांनी कधीही समर्थन दिले नाही. अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी कित्येकदा स्वपक्षावर टीकाही केली. 1992 साली अध्यक्षीय निवडणुकीत बिल क्‍लिंटन यांनी त्यांचा पराभव केला. पुढे धाकटे बुश यांनी अध्यक्षपद प्राप्त केल्यावर, त्यांनी इराक व अफगाणिस्तानवर आक्रमण केले. त्यावेळी आपल्या मुलाच्या या बेलगाम धोरणांवर पित्याने कठोर टीकाही केली. तर क्‍लिंटन आणि थोरले बुश यांचे सूर इतके जुळले की, हे पिता-पुत्र आहेत की काय, असे वाटावे. क्‍लिंटन यांनी त्यांच्यावर अनेक आंतरराष्ट्रीय कामगिऱ्याही सोपवल्या.

सोविएत युनियनचे पतन, शीतयुद्धाची समाप्ती, बर्लिन भिंत इतिहासजमा होणे आणि जर्मनीचा नाटोतील सहभाग या ऐतिहासिक घटना त्यांच्या कारकिर्दीतच घडल्या. गोर्बाचोव्ह यांनी पेरिस्त्रोइका आणि ग्लासनोस्तची हाक दिली, तेव्हा त्यास काही ना काही प्रतिसाद देण्यावाचून अमेरिकेपुढेही इलाज नव्हता. धाकट्या बुश यांची एकूण समजशक्‍ती आणि राजकीय जाण बेतास बातच होती. उलट थोरल्या बुश यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम जाण होती. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात रोमहर्षक कामगिरी बजावली होती. त्यांच्या विमानावर बॉंबफेक होऊनही, पेटते विमान तसेच चालवत, त्यांनी शत्रूपक्षाचा भेद केला आणि अखेरच्या क्षणी विमानातून बाहेर समुद्रात उडी मारली.

थोरल्या बुश यांनी पित्याचा तेलाचा व्यवसाय भरभराटीस नेला. अर्थात, अमेरिकेचे उपाध्यक्ष असताना स्वतःच्या कंपनीस त्यांनी कंत्राटेही मिळवून दिली. त्या कंपनीत त्यांचा भागीदार होता बिन लादेन. ओसामाचा हा वडील भाऊ. सद्दाम हुसैनच्या नेतृत्वाखाली इराकी फौजांनी 1990 मध्ये कुवेतवर आक्रमण केले, तेव्हा बुश यांनी कुवेतला मदतीसाठी 32 देशांची आघाडी करून, आंतरराष्ट्रीय कायद्याची पाठराखण केली होती. आक्रमक सद्दामविरोधात त्यांनी युद्ध पुकारले. तेव्हा बगदादपर्यंत अमेरिकन फौजा पोहोचल्या, तरी त्यांनी सद्दामचा खातमा केला नाही. बुश यांनी 1991 साली माद्रिदला शांतता परिषद घेऊन, इस्रायल व अरब देशांना वाटाघाटींसाठी एकत्र आणले. 1993 साली त्यांनी शस्त्रास्त्र कपातीसबंधीच्या दोन करारांवर स्वाक्षरी करून, नाफ्टा करारात वाटाघाटी केल्या होत्या.

जॉर्ज एचडब्ल्यू बुश हे अमेरिकेचे 41 वे अध्यक्ष. त्यांच्या अगोदर रोनाल्ड रिगन हे अध्यक्ष होते. सोविएत युनियन हे सैतानी साम्राज्य आहे आणि त्याची भिंत पाडायला हवी. तसेच जगावर अमेरिकेचे राज्य असले पाहिजे, ही रेगन यांची दृष्टी होती. रिगन हे हॉलिवूडधील वेस्टर्नपटांचे दुय्यम दर्जाचे नायक होते. त्यामुळे बोलबच्चनगिरी करण्यात त्यांचा हातखंडा होता. जॉर्ज हे त्यांचे उपाध्यक्ष आणि नंतर वारसदार होते. बुश कोणत्याही अर्थाने वाचाळ नव्हते. परंतु अ न्यू वर्ल्ड ऑर्डर, म्हणजेच जगाची नवी व्यवस्था, हे त्यांचे खास शब्द होते. दहशतवादापासून मुक्‍त, न्यायाची चाड असणारे, शांततावादी असे नवे जग निर्माण करणे, ही त्यांची दृष्टी होती.

आखाती युद्ध-1 सुरू होण्यापूर्वी, पूर्वीच्या जागापेक्षा संपूर्णतः भिन्न असे जग निर्माण करण्याची भाषा बुश यांनी केली होती. हे युद्ध जेव्हा सुरू झाले, तेव्हाच म्हणजे 1990 साली सीएनएनसारख्या वृत्तवाहिन्या आपल्याकडे काही ठिकाणी दिसू लागल्या होत्या. त्यामुळे अमेरिकन वकिलातीत वा माहितीकेंद्रात जाऊन, तेथे या युद्धाची प्रत्यक्ष दृश्‍ये पाहणे, मोलाचे वाटत असे. 11 सप्टेंबर 1990 रोजी बुश यांनी कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करून आपली युद्धनीती अधोरेखित केली. मात्र आखाती युद्ध-1 नंतरही जगापुढील समस्या सुटण्याऐवजी, त्या गंभीरच बनत गेल्या. कारण त्यानंतरच्या दशकात, म्हणजे 2003 साली, इराककडे रासायनिक अस्त्रे असल्याचा खोटा आरोप करून, जॉर्ज डब्ल्यू बुश यंनी तेथे बॉंबहल्ले घडवले. सद्दामला पकडण्यात आले व त्यानंतर फासावर चढवण्यात आले.

अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीला संपवण्यात आले. या बॉंबफेकीत लाखो लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले. निरपराध महिला व बालकेही बळी पडली. लाखो घरे जमीनदोस्त झाली. अफगाणिस्तान व इराकमध्ये अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या राजवटी प्रस्थापित झाल्या. परंतु यातूनच इसिसचा जन्म झाला. त्यामुळे इराक, इराण, सौदी अरेबिया, सीरिया या देशांत अस्वस्थता पसरली. सीरिया व येमेनमध्ये युद्ध सुरू झाले आणि निर्वासितांचा ओघ युरोप व अन्यत्र सुरू झाला. तेव्हा, थोरल्या बुश यांना जे जग अपेक्षित होते, ते अस्तित्वात न येता उलट आपण युद्धग्रस्त झालो.
डोनाल्ड ट्रम्प स्वतःला राष्ट्रवादी म्हणवून घेतात. मागच्या तीस वर्षांतील अमेरिकेची धोरणे त्यांना बिलकुल पसंत नाहीत.edi धाकटे बुश यांनी दुसरे आखाती युद्ध छेडले, तेव्हा कॉलिन पॉवेल आणि डिक चेनी हे त्यांचे प्रमुख साथीदार होते. पण या दोघांनाही महत्त्व मिळाले, ते थोरल्या बुश यांच्या कारकिर्दीतच. अफगाणिस्तानमधून सोवएत फौजांनी माघार घेतली, तेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानकडे दुर्लक्ष केले. पाकिस्तानने आपला अण्वस्त्र कार्यक्रम रेटला, तोही थोरल्या बुश यांनी गंभीरपणे घेतला नाही. मात्र आपल्या चिरंजीवांसारखे ते विवेकशून्य नव्हते. जगावर अकारण युद्ध लादण्याचा नादानपणा त्यांनी केला नाही. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारणात मध्यममार्ग अवलंबून, सहमतीचे राजकारण करावे, हे त्यांचे धोरण होते. अमेरिकेच्या आर्थिक धोरणाबाबतही त्यांनी आत्मपरीक्षणाचा मार्ग स्वीकारला होता. इतर देशांच्या आकांक्षांचाही त्यांनी विचार केला. अमेरिकेने फक्त आपला स्वार्थ बघावा, बाकी जग गेले खड्ड्यात. असा कोता विचार त्यांनी केला नाही. मवाळ राजकीय धोरण हे कालबाह्य ठरत असल्याबद्दल त्यांनी खंतही प्रकट केली होती. त्यामुळे 2016 मध्ये त्यांनी ट्रम्प यांना मत दिले नाही. ट्रम्प यांना मात्र या गोष्टीची कितपत खंत वाटत असेल, असा प्रश्न पडतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)