स्मरणशक्‍तीवर वायुप्रदूषणाची बाधा

पुणेकरांचे आयुष्य दीड वर्षांनी घटणार : जागतिक संशोधनातून वास्तव उघड

पुणे – वाढत्या वायूप्रदुषणामुळे पुणेकरांचे आयुष्य सरासरी दीड वर्षांनी कमी होत आहे. इतकेच नव्हे, तर या वायूप्रदूषणाचा परिणाम आपल्या समरणशक्‍तीवर देखील होत असल्याचे विदारक वास्तव एका जागतिक संशोधनातून समोर आले आहे.

निरोगी आयुष्यासाठी शुद्ध वातावरण असणे गरजेचे असते. मात्र, गेल्या काही वर्षात शहरीकरण, विविध विकासकामे आणि वाढत्या सोयी-सुविधा यांमुळे पर्यावरणावर मोठे परिणाम होत आहे. विशेषत: शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये वायूप्रदूषण हा सर्वाधिक चिंतेचा विषय बनला आहे. नुकत्याच टेक्‍सास येथील विद्यापीठाने केलेल्या आणि एन्व्ह्ययर्मेंटल सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी लेटर्सने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, भारतीय शहरांमधील नागरिकांचे आयुर्मान हे दीड वर्षांनी घटत आहे. इतर देशांमध्ये हेच प्रमाण 1.9 वर्षे ते 9 महिने इतके आहे.

पीएम 2.5 च्या निर्मितीचे स्रोत:
– वाहनांची वर्दळ
– वीज प्रकल्प
– आग
– शेती आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्सर्जन

संशोधनानुसार शहरी भागातील हवेत पीएम 2.5 या घटकाचे प्रमाण जास्त असते. वायूप्रदूषणाला कारणीभूत असलेल्या या घटकामुळे मानवी आरोग्यवरही गंभीर परिणाम होतो. अतिशय सुक्ष्म स्वरूपात असलेला हा घटक पीएम 10 पेक्षाही अधिक घातक आहे. आकाराने सुक्ष्म असलेला पीएम 2.5 हा थेट रक्‍तपेशीत प्रवेश करत असल्याने ह्रदयविकार, फुफ्फुसाचे कॅन्सर आदी गंभीर आजार उद्भवत आहेत.

वाहनांमुळे होते सर्वाधिक वायूप्रदूषण :
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्कर्षानुसार, वाहतुकीमुळे सर्वाधिक वायूप्रदूषण होते. वाहनांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनाक्‍साइड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजनचे उत्सर्जन होते. विविध बांधकामे, खराब रस्ते आणि इंधन जळल्यानंतर धूलिकणाची (पी.एम) निर्मिती होते. मंडळातर्फे हवेच्या नियमितपणे घेण्यात येणाऱ्या नोंदीनुसार, जानेवारी महिन्यात वायू प्रदूषणाची उच्चांकी पातळी 111, फेब्रुवारी-135, मार्च-143, एप्रिल-137, मे-120, जून-101, जुलै-69, ऑगस्ट-86 इतकी नोंदविण्यात आली आहे.

शहरातील वाढत्या वायूप्रदूषण हे सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. आगामी काळात निश्‍चितच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
– मंगेश दीघे, पर्यावरण विभागप्रमुख, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)