स्पेशल चाय…

अनुराधा पवार

“”अहो, तुम्ही चहा घेणार का? स्पेशल!” कमलने विचारले. त्या दिवशी सुटी होती म्हणून आम्ही श्रीधर भाऊजींकडे गेलो होतो. त्यांच्याकडे आणि (आमच्याकडेही) सारेच चहाबाज. माझ्या मिस्टरांना तर तासातासाला म्हटले तरी चहा हवाच. श्रीधर त्यांचेच भाऊबंद-पक्के चहाबाज! एक वेळ जेवायला नसले तरी चालेल, पण चहा हवाच.

आम्ही सारे गप्पा मारत बसलो होतो. चहाचा एक राऊंड झाला होता. श्रीधरचा एकूण अविर्भाव बघूनच त्यांना चहाची तल्लफ आली हे कमलने ओळखले आणि “”अहो, तुम्ही चहा घेणार का? स्पेशल!” असा प्रश्‍न विचारला. खरं तर चहा घेणार का? हा अगदी साधा प्रश्‍न. कोठेही विचारला जाणारा. घरी, दारी, ऑफिसात, प्रवासात….. चहा हे एक निमित्त असते. एकत्र येण्याचे, गप्पा मारण्याचे, टाईमपास करण्याचे. तसा सकाळचा चहा ही एक आपली सवय झालेली आहे. बहुसंख्य घरात सकाळचा चहा होतोच. काही ठिकाणी तर एकापेक्षा अधिक वेळा. पूर्वी तर अनेक घरात चुलीवर-तेव्हा गॅस हा प्रकार नव्हता आणि स्टोव्ह ही सुद्धा लक्‍झरी होती-सतत चहाचे भांडे असायचेच. आल्यागेल्याला चहा देण्यासाठी.

कमलने चहा हवा का? स्पेशल ” हा तसा साधा वाटणारा प्रश्‍न विचारताच श्रीधरचा चेहरा गोरामोरा झाल्याचे मला जाणवले. श्रीधरच्या उत्तराची वाट नबघताच कमलने जाऊन चहा करून आणला आणि प्रत्येकाच्या हाती चहाचा कप दिला. श्रीधरच्या हाती देतानाही “स्पेशल’ आहे बर कां! असा थोडासा “खोचक’ शेरा दिला. या “स्पेशल शब्दात काहीतरी रहस्य आहे असे मला जाणवले. आमच्या घरातील वातावरण अगदी खेळकर असल्याने मी “या “स्पेशल’ची काय बात आहे?’ असे श्रीधर भाऊजींना विचारले. त्यांनी उत्तर देणे टाळले, तेव्हा कमललाच प्रश्‍न केला. तिने नवऱ्याकडे पाहात “सांगू का?’ असे विचारले आणि त्यानेही हतबुद्ध झाल्यासारखे “सांगा. नाहीतरी तुम्ही नंतर गावभर सांगणारच आहात, तेव्हा सांगून टाका आमच्याच पुढ्यात… नाहीतर मीच सांगून टाकतो माझी फजिती.” असे पडक्‍या सुरात उत्तर दिले.

खरं तर श्रीधरभाऊजी म्हणजे एकदम खेळकर, जॉली गुड फेलो म्हणतात तसा माणूस. त्याच्या मुलीही त्याच्याशी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणीशी वागावे अशा मोकळेपणाने वागायच्या. आताही त्या दोघी समोर बसल्याच होत्या. स्पेशलचा विषय निघताच त्यांना हसू आवरत नव्हते. दोघींचेही आपसात खुसूखुसू चालू होते.
तुम्ही नको, मीच सांगते तुमची गंमत, असे म्हणून कमलने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
परवा रात्रीची गोष्ट, नेहमीप्रमाणे आम्ही रात्री साडेबारा-एक वाजता झोपलो. दोन अडीच वाजता यांची स्वारी उठली. चहाची तल्लफ आली होती. काही कामही करायचे होते कॉम्प्युटरवर. अगोदर मला आवाज दिला , कमळे, ए कमल… जागी आहेस का? ‘मला नुकती झोप लागत होती. मी काही दाद दिली नाही. मग ते मुलींकडे वळले. “शधोऽऽऽ’ (श्रद्धा), विधोऽऽऽ’ (विद्या) अशा त्यांनाही हाका मारल्या, पण त्याही गाढ झोपेत होत्या. मग ते उठून किचनमध्ये

गेले. मला माहीत होते, की ते आता स्वत:च चहा करून घेतील. मी गप्प झोपी गेले. ते चहा घेऊन काम करत बसले.
साडेपाचला मी उठले. किचनमध्ये गेले. म्हटले यांना चहा करून द्यावा, पण किचन टेबलवर चहाचे भांडे दिसेना. चहासाखरेचे डबेही जागेवरून हललेले नव्हते. मी विचारले रात्री चहा करून भांडे घासून ठेवले की काय तुम्ही? ”

“”छे छे!” ते उत्तरले,”” मी कशाला भांडे घासत बसू. मी तर चहाही केला नाही, तुम्हीच रात्री त्या भांड्यात चहा करून ठेवला होता ना, तोच गरम करून घेतला. चांगला दोन कप होता?”
मला नवल वाटले, रात्री तर आम्ही कोणी चहा केला नव्हता. मग यांना आयता चहा कोठून मिळाला? “कुठला चहा घेतला तुम्ही?” मी विचारले. त्यांनी सिंकजवळ्चे भांडे दाखवले. माझ्या डोक्‍यात लख्ख प्रकाश पडला.

“”अहो, तो चहा नव्हता. रात्री श्रद्धाने खरकटी भांडी विसळून ठेवलेले पाणी होते ते. टाकायला विसरली पोरगी आणि तुम्ही तेच दूध टाकून चहा म्हणून घेतले? अरे अरे अरेऽऽऽ” माझे हे बोलणे ऐकून यांना धक्काच बसला. चेहरा एकदम पडलाच त्यांचा. काही न बोलता उठून फिरायला निघून गेले. तोपर्यंत मुलीही उठल्या होत्या. पप्पांचा पराक्रम ऐकून त्यांनाही हसू आवरेना.
असा होता यांचा “स्पेशल’ चहा. कमलने आपली गोष्ट संपवली. काही त्रास नाही ना झाला? मी विचारले. “नाही कसा?’ श्रीधरकडे रोखून बघत कमल उत्तरली. दिवसभर जुलाब होत होते. त्या स्पेशल चहाने.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)