स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत 173 लाभार्थींची निवड

बारामती- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत प्रात्यक्षिक प्लॉटसाठी बारामती तालुक्‍यातील 173 लाभार्थ्यांची प्रोड्युसर कंपनीमार्फत निवड करण्यात आली आहे. यातील 16 प्रात्यक्षिक प्लॉटची “आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक कुंडलिक कारखिले यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कृषी पणन तज्ज्ञ विक्रम निंबाळकर, “आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, कऱ्हामाई प्रोड्युसर कंपनीचे संचालक विजय साळुंके, प्रात्यक्षिक प्लॉट लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. यादरम्यान कुंडलिक कारखिले यांनी प्रात्यक्षिक प्लॉट लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी विकास प्रकल्पासंदर्भात माहिती दिली. आगामी काळात या प्रकल्पातून राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत शेतकऱ्यांना अवगत केले. शेतकऱ्यांकडून पिकांबद्दल माहिती जाणून घेऊन अडचणीसंदर्भात त्यांना मार्गदर्शन केले.
प्रकल्प उपसंचालक कारखिले यांनी बारामती येथील कऱ्हामाई ग्रो-प्रोड्युसर कंपनी लि., काऱ्हाटी आणि भीमथडी ग्रो-प्रोड्युसर कंपनी, मौजे जळगांव कप यांना भेट देऊन चर्चा केली. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निविष्टांबाबत माहिती दिली. कृषी पणन तज्ज्ञ निंबाळकर यांनी पिकाचे पाणी व्यवस्थापन आणि कीड, तसेच रोगव्यवस्थापनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रात्यक्षिक लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांद्वारे नव-नवीन तंत्रज्ञानाची माहिती होऊन त्याचा चांगला फायदा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आमच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)