स्थायी समितीत आयुक्‍तच “फैलावर’

 

पिंपरी- भोसरी-इंद्रायणीनगरमधील बॅडमिंटन हॉलच्या विकासकामाचा विषय मार्गी लावण्यासाठी धोरण ठरवावे लागेल, असे उत्तर महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती सभेत दिले. स्थायीचा निर्णय झालेला असतानाही अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे फक्‍त भोसरीतील विकासकामांनाच धोरण ठरवावे लागत आहे, असे का? असा प्रश्‍न स्थायी समिती सदस्य विकास डोळस यांनी उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्‍त मात्र निरुत्तर झाले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दोन्ही आमदारांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामांचे विषय मंजूर करताना अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मात्र लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा सामना पहायला मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इंद्रायणीनगर येथील बॅडमिंटन हॉल एका संस्थेला करारानुसार चालवायला देण्याबाबत नम्रता लोंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी स्थायीने मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही या प्रस्तावाची अंमलबजावणी झालेली नाही. आज झालेल्या स्थायीच्या बैठकीत लोंढे यांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी झालेली नाही, अशी आयुक्त हर्डीकर यांना विचारणा केली. मात्र, आयुक्तांनी त्यांच्या प्रश्‍नाला असमाधानकारक उत्तरे दिली. तसेच, याकरिता धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर स्थायी सदस्य विकास डोळस चांगलेच भडकले. त्यांनी आयुक्तांना फैलावर घेतले. भोसरीतील नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांबाबत धोरण ठरविण्याची उत्तरे देता. अन्य भागात हा निकष का लावत नाही? यापुर्वीदेखील प्रशासनप्रमुख या नात्याने अशीच बेजबाबदार उत्तरे तुम्ही भोसरीतील लोकप्रतिनिधींना दिली आहेत. प्रशासनाचा हा दुजाभाव खपवून घेणार नाही. क्रीडा विभागाअंतर्गत असलेली क्रीडांगणे, व्यायामशाळा अशा सर्वच आस्थापनांचे करार रद्द करुन, धोरण ठरविल्यनंतरच त्यांचे वाटप करावे, अशी मागणी केली. यावर आयुक्त हर्डीकर यांना उत्तर देता आले नाही.

याशिवाय महापालिकेच्या प्रत्येक विकासकामांना सल्लागार नेमण्याच्या भूमिकेवरदेखील विकास डोळस यांनी टीका केली. मोठ्या प्रमाणावरील सल्लागार नियुक्तीने आता स्थायी समितीची सल्लागार समिती अशी ओळख झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्‍त केली.सल्लागारांच्या नियुक्तीनंतरही अनेक विकासकामे चुकीची झाल्याची बाब त्यांनी यावेळी त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्याऐवजी शहरातील बेरोजगार अभियंत्यांची सल्लागारपदी नियुक्ती केल्यास किमान त्यांना तरी रोजगार मिळू शकेल, असा सल्लाही डोळस यांनी प्रशासनला यावेळी दिला.

मेट्रोला कोणाकडून होतो पाणीपुरवठा?
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाला कोणत्या यंत्रणेकडून पाणीपुरवठा केला जातो, अशी विचारणा राष्ट्रवादीच्या गीता मंचरकर यांनी केली. मात्र, यावर स्थापत्य अभियंता श्रीकांत सवणे यांना उत्तर देता आले नाही. स्थायीच्या पुढील साप्ताहिक बैठकीत याचे उत्तर देण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)