स्थायी समितीचे नगरसेवकांना मिळाले ’31 मार्च’चे गिफ्ट

‘स’ यादीतील मागील वर्षांच्या कामांना नवीन अंदाजपत्रकातून निधी देणार

पुणे – महापालिकेच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकांची मुदत येत्या 31 मार्चला संपत आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या “स’ यादीतून सुरू करण्यात आलेली कामे 31 मार्चनंतर बंद होणार आहेत. त्यातील अनेक कामांना 2018-19 च्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून दिलेला नव्हता. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. अखेर ही नाराजी स्थायी समितीने दूर केली असून या कामांसाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकातून निधी देण्यास मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

हा निधी नगरसेवकांच्या “स’ यादीतूनच वर्गीकरणाद्वारे दिला जाणार आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे 2018 पर्यंतची मुदत असणार आहे. या कामांमध्ये 31 मार्चपर्यंत वर्कऑर्डर देण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या कामांचाच समावेश असणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महापालिकेच्या 207-18 च्या अंदाजपत्रकात स्थायी समिती अध्यक्षांनी नगरसेवकांनी सुचविलेल्या “स’ यादीतून सुमारे 700 कोटींची कामे प्रस्तावित केली होती. त्यात प्रामुख्याने गल्लीबोळांचे कॉक्रीटीकरण, जलवाहिन्या टाकणे, पदपथ तयार करणे, पथदिवे लावणे, डांबरीकरण, तसेच स्वच्छतागृहे आणि समाज मंदिरांच्या देखभाल दुरूस्तीच्या कामांचा समावेश होता.

मात्र, मागील वर्षी अंदाजपत्रक मे महिन्यात सादर झाल्याने आणि त्यानंतर 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाल्याने नगरसेवकांच्या “स’यादीतील बहुतांश कामांच्या निविदा जानेवारी महिन्यात पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर त्याच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. मात्र, या कामासाठीचा निधी 31 मार्च 2018 पर्यंतच खर्च करण्यात येणार असल्याने ही कामे बंद पडणार आहेत. तर यातील अनेक कामांना नवीन अंदाजपत्रकात नव्याने निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे ती अर्धवटच राहणार आहेत.

या कामांमध्ये प्रामुख्याने सिमेंट रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे कामे अर्धवट राहिल्यास अडचण निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने अनेक नगरसेवकांकडून या कामांना मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकांनी मुख्यसभेत केली होती. त्यानंतर या कामांसाठी आपल्या 2018-19 च्या अंदाजपत्रकातून हा निधी देण्यास नगरसेवकांनी तयारी दर्शविली होती. त्यानुसार, भाजप नगरसेवकांनी प्रस्ताव दिला होता. त्यास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या कामांची रक्कम लॉकिंग करून देणार असल्याचे मुळीक म्हणाले. तसेच 31 मार्चपर्यंत वर्क ऑर्डर देण्यात येणारी आणि सध्या सुरू असलेल्या कामांचाच यात समावेश राहणार असल्याचेही ते म्हणाले.

अहवाल सादर करण्याच्या सूचना
या कामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचे योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले. प्रामुख्याने ही कामे क्षेत्रीय कार्यालय आणि काही प्रमुख विभागांशी संबधित असून त्यांची एकत्रित माहिती नाही. त्यामुळे प्रशासनाशी चर्चा करून या बाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. तसेच पुढील वर्षाच्या संबधित नगरसेवकांच्या “स’ यादीतूनच हा निधी जाणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रकावर त्याचा भार येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)