स्थायीत भोसरीला झुकते माप

  • सदस्य निवड ः नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका स्थायी समितीच्या रिक्त पाच सदस्यांच्या जागेवर भाजपच्या नवख्या नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे यांची तर अपक्ष आघाडीच्या साधना मळेकर यांची निवड केली आहे. स्थायीच्या सभापती निवडीवरून भोसरीतील आमदार महेश लांडगे गाटाची नाराजी दूर करण्यासाठी झुकते माप देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज मंगळवारी (दि. 20) झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पाच सदस्यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. स्थायी समितीतील सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु, सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्‍चित केली जातात. चिठ्ठीद्वारे भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती देखील झाली आहे. चिठ्ठीतून वाचलेले भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते.

परंतु, सर्वच नगरसेवकांना संधी देण्याचा फतवा काढल्याने स्थायी समितीत पाच वर्षात 55 नगरसेवकांना काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सदस्यांचा ड्रॉ काढण्यापूर्वीच भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक अशा 11 नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे लिहून घेतले होते. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये. यासाठी भाजपने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. त्यामुळे पाच वर्षात 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी ड्रॉमधून बचावलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी (दि.9) मंजूर केले. त्यामुळे त्यांच्या जागी पाच नवीन नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापौरांनी केली नावांची घोषणा
स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागांवर भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, विकास डोळस, अर्चना बारणे या चार आणि अपक्ष साधना मळेकर यांची सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकांची नावे बंद पाकिटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे दिली. त्यानंतर संबंधीतांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर काळजे यांनी केली. त्यामध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाला झुकते माप दिले आहे. कारण, स्थायीच्या सभापती निवडीवरून त्यांच्यात निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी निर्णय घेतल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)