स्थायीच्या अंदाजपत्रकाविरुद्ध कोर्टाचा दरवाजा

राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक न्यायालयात : अंदाजपत्रकाविरोधात याचिका दाखल

  • सर्व नगरसेवकांच्या प्रभागात समान तरतूद न केल्याचा आरोप
  • समान निधीवाटप करण्याबाबत आदेश देण्याची मागणी

पुणे – महापालिका अंदाजपत्रकामध्ये ” स’ यादीचे निधीचे समान वाटप न झाल्यामुळे महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्याविरोधात जिल्हा दिवाणी न्यायालयात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याचिका दाखल केली आहे. अंदाजपत्रकामधील असमान निधीच्या वाटपावरुन अंदाजपत्रकावर पहिल्यांदाच अशाप्रकारे पहिल्यांदाच दावा दाखल केल्याचा प्रकार घडला आहे. नगरसेवक महेंद्र पठारे, योगेश ससाणे आणि ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे.
स्थायी समितीने 11 मे रोजी मुख्यसभेला अंदाजपत्रक सादर केले आहे. या अंदाजपत्रकावर गुरूवारपासून मुख्यसभेत चर्चेला सुरूवात झाली आहे. येत्या दोन दिवसामध्ये अंदाजपत्रक बहुमताच्या जोरावर मंजूर होण्याची शक्‍यता असून, या अंदाजपत्रकात केवळ स्वपक्षीय सदस्यांच्या प्रभागांमध्येच भरीव तरतूद केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
अंदाजपत्रकात सत्ताधारी नगरसेवकांना पाच ते सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना केवळ दीड ते तीन कोटी रुपयांचाच निधी देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर स्वत: स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि सभागृहनेते यांच्या प्रभागांमध्ये 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्षांनी 40 कोटी रुपयांची तरतूद स्वत:च्या प्रभागात घेतली आहे.
महापालिकेत भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर अंदाजपत्रकाला मंजुरी मिळेल, असे झाल्यास न्यायालयाने त्यांना समान वाटप करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अर्जामध्ये करण्यात आली आहे. गावे समाविष्ट झाल्यानंतर आमच्या भागातून महापालिकेला सुमारे दोनशे कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. असे असताना आमच्या भागाला सापत्नभावाची वागणूक देत कमी तरतूद करण्यात आल्याचे पठारे यांचे म्हणणे आहे. 22 मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

काय आहे मागणी
पुणे शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व नगरसेवकांना समान तरतूद असणे आवश्‍यक आहे. सन 2017-18 च्या अंदाजपत्रकामध्ये सत्ताधारी नगरसेवकांना जास्त आणि विरोधकांना कमी असा दुजाभाव करता येणार नाही. यामुळे असमान विकास होईल. महापालिकेला कराच्या पैशांतून उत्पन्न मिळत असते. सर्व पुणेकर कर भरतात. त्यामुळे सर्व नगरसेवकांना विकास कामांसाठी समान तरतूद मिळाली पाहिजे, अशी मागणी ससाणे, जाधव आणि पठारे यांनी न्यायालयाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)