स्थायीचे अंदाजपत्रक बेकायदेशीर

राष्ट्रवादी कॉंग्रेस : भाजपकडूनही प्रतिदावे
पुणे – महापालिका ज्या मुंबई प्रांतिक अधिनियम कायद्यानुसार चालते त्यामध्ये नगरसेवकांकडून कामाची “स’ यादी मागवण्याचे स्थायी समितीला अधिकाराच नाहीत. त्यामुळे हे अंदाजपत्रक बेकायदेशीर असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी शुक्रवारी सभागृहात केली.
स्थायी समितीने तयार केलेल्या अंदाजपत्रकावर सलग दुसऱ्या दिवशी चर्चा सुरू झाली. स्थायी समिती अध्यक्षांनी मुख्य सभेला सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये नगरसेवकांना विकास कामांसाठी तरतूद देत असताना दुजाभाव करण्यात आला आहे. नगरसेवकांना समान तरतूद मिळाली पाहिजे तरच पुणे शहराचा समान विकास होईल, असे जाधव यांनी भाषणात सांगितले.
नगरसेविका आरती कोंढरे यांनी स्थायी समितीने तयार केलेल्या अंदाजपत्रक जे स्वप्न दाखवणारे नसून स्वप्न पूर्ण करणारे असल्याचे सांगत विरोधकांना उत्तर दिले. अंदाजपत्रकामध्ये मांडण्यात आलेल्या योजना निश्‍चित पूर्ण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला.
नदी सुधार, पंडित दिनदयाळ उपाध्याय आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून सर्व घटकांचा विचार करण्यात आला असल्याचे नगरसेवक राजेश येनपुरे यांनी सांगितले. नगरसेवक ज्योती कळमकर, दिलीप वेडेपाटील, स्मिता वस्ते, रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, प्रकाश कदम, नंदा लोणकर, दीपक मानकर, बाळासाहेब ओसवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, ज्योत्स्ना एकबोटे, विशाल धनवडे, दीपाली धुमाळ, हेमलता मगर, अमोल बालवडकर, अल्पना ओर्पे, युवराज बेलदरे, माधुरी सहस्त्रबुद्धे आदींची यावेळी भाषणे झाली.

महापालिकेची स्वायत्तता धोक्‍यात
राज्यशासनाने विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बांधकामावरील प्रिमियम शुल्काची तरतूदच रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मागील वर्षी बांधकाम विभागाच्या एकूण उत्पन्नाच्या 60 टक्के उत्पन्न हे बांधकाम प्रिमियममधून महापालिकेला मिळाले आहे. महापालिकेने दोन अभय योजना राबवल्यामुळे महापालिकेला 600 कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. यावर्षी मिळकतकर विभाग आणि बांधकाम विभाग यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली असून, उद्दिष्ट गाठणे शक्‍य नसल्याचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)