स्थलांतरित पक्ष्यांमुळे अभ्यासक, निरीक्षकांची वर्दळ

छायाचित्रकारांनाही संधी : यंदा पक्ष्यांची संख्याही वाढली

पुणे – कमी पावसामुळे जलाशयांमधील कमी होणारे पाणी, पाण्याची पातळी कमी झाल्याने उघडे पडलेले काठ, त्यामुळे मिळणारे मुबलक अन्न यामुळे पुणे जिल्ह्यात यंदा स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी तसेच त्यांच्या हालचाली आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी शहरालगतच्या परिसरांमध्ये पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर्स यांची वर्दळ वाढत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निसर्गसंपदेने संपन्न अशा पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा अधिवास आहे. विविध प्रजातींच्या स्थानिक पक्ष्यांबरोबरीने विशिष्ट कालावधीत स्थलांतर करून येणारे पक्ष्यांची संख्यादेखील मोठी आहे. हे पक्षी उजनी जलाशय, सिंहगड परिसर, मुळशी, पुरंदर, ताम्हीणी, पाषाण तलाव या परिसरामध्ये आढळतात. यामध्ये फ्लेमिंगो, कस्तूरपक्षी, चित्रबलाक, चमच्या पक्षी (युरेशिअन स्पूनबिल) अशाप्रकारच्या पक्ष्यांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षात पक्ष्यांची विशेषत: स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण अनेक निरीक्षकांनी नोंदविले होते. पाऊस कमी झाल्याने यंदाही या पक्ष्यांचे दर्शन होणार नाही, अशी शक्‍यता व्यक्त केली जात असतानाच मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी या भागात दिसत आहेत. त्यामुळेच याठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास करणारे निरीक्षक तसेच उत्साही फोटोग्राफर्सची संख्यादेखील वाढत आहे.

याबाबत पक्षीनिरीक्षक संदीप नगरे म्हणाले, “गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा उजनी जलाशय परिसरात प्रचंड प्रमाणत फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. एकट्या कुंभारगावात सुमारे तीन हजार पक्षी सध्या दिसताहेत. त्याव्यतिरिक्त इतर प्रजातींचे पक्षीदेखील मोठ्या पाहायला मिळताहेत. त्यामुळेच या परिसरात पक्षी निरीक्षकांचेही प्रमाण वाढले आहे. अभ्यासाव्यतिरिक्त केवळ हौस म्हणून पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे.’

कमी पावसामुळे जलाशयांचे काठ खुले पडले आहेत. काठ परिसरातील शेवाळ हे पक्ष्यांचे मुख्य अन्न आहे. त्यामुळेच या ठिकाणी यंदा मोठ्या प्रमाणात पक्षांचे आगमन होत आहे.
– धर्मराज पाटील, पक्षी निरीक्षक. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)