स्मरण
प्रा. डॉ. गजानन एकबोटे
“आंबेडकर तत्त्वज्ञान’ या पुस्तकाचे लेखक लिहितात, भारतीय स्त्रीची सामाजिक उच्च दर्जाची बुद्धकालीन जी परमोच्चता कालांतराने अवनत झाली, तिला जबरदस्त हादरे देण्याचे कार्य महात्मा जोतीराव फुले यांनी केले. त्याच दीप्तीने प्रज्वलित होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या रूपाने जे कार्य केले ते ऐतिहासिक व युगप्रवर्तक असेच आहे. त्यांनी भारतीय घटनाप्रमुख म्हणून स्त्री स्वातंत्र्याच्या दृष्टीने जे अभूतपूर्व असे हिंदू कोड बिल सादर केले, ती भारतीय स्त्रीच्या हातापायांत जखडलेल्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणारी महत्त्वपूर्ण घटना होती.
डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाविषयी स्पष्ट खुलासा करूनही विरोधकांनी जो गदारोळ करायचा तो केलाच. तरीसुद्धा डॉ. आंबेडकर यशस्वी होऊन सुट्या स्वरूपात बिल पास झालेच. स्त्री-धन, घटस्फोट, आदी दृष्टीने स्त्रियांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाले. त्या आधीच मतदान, शिक्षण, रोजगार यांची राज्यघटनेने हमी द्यावी, असे प्रयत्न करण्यात बाबासाहेब यशस्वी झालेलेच होते. अलीकडे बलात्कारविरोधी, हुंडाविरोधी, स्त्रीधनावर स्त्रीचा हक्क, सासरचा छळ, जळीत प्रकरण, घटस्फोट आदी संबंधित जे अनेक कायदे स्त्रीच्या फायद्याचे करण्यात आले आहेत, त्यांचे सूतोवाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या हिंदू कोड बिलातच झालेले होते.
त्यामुळे भारतीय स्त्रीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव प्रातःस्मरणीय झाले आहे. आपल्या स्वदेशी भगिनींवर केवढे हे अपरिमित उपकार त्यांनी करून ठेवले आहेत. प्रत्येक भारतीय स्त्री बाबासाहेबांची ऋणी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्रियांविषयी आपुलकी होती, याचे कारण त्यांच्या जीवनात आलेल्या स्त्रियांचा अनुभव हा अतिशय समृद्ध व सुखद असा होता. त्यांची आई भीमाई ही तर बाबासाहेबांच्या लहानपणीच वारली होती. पण त्यांच्या आत्याने त्यांचे संगोपन मोठ्या मायेने केले. नंतर त्यांची पत्नी सौ. रमा या साध्वीने हा महापुरुष जपला होता.
अशा पुरुषाला जपणारी, त्याला जीवनभर फक्त प्रेमच देणारी स्त्रीजात पिढ्यान्पिढ्या दयनीय अवस्थेत आहे, स्वतःच्या प्रश्नांबाबत अनभिज्ञ आहे, हे सर्व कविमनाच्या डॉ. बाबासाहेबांना कसे बरे सहन होणार? आपला एक ग्रंथ आपल्या इंग्लंडमधल्या “F’ नावाच्या अभिभाविकेला समर्पित करताना ते म्हणाले होते, “In thy presence is pleasure of the joy!’ केवढा हा हळुवार भाव. केवढा हा स्त्रीविषयी डॉ. बाबासाहेबांच्या मनाच्या ठिकाणी असणारा मोठेपणा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री-शिक्षणावर विचार
डॉ. बाबासाहेबांनी महाड समता संग्रामाच्यावेळी दि. 27 डिसेंबर 1927 रोजी स्त्रियांना उद्देशून जे भाषण केले, त्यात स्त्रीशिक्षणाचे महत्त्व विशद करताना, “तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे. ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत. त्या स्त्रियांनाही आवश्यक आहेत,’ असा उपदेश करताना आपल्या पूर्वजांनीही शिक्षणाचे महत्त्व जाणल्यामुळेच त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिले, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. त्यांच्या आयुष्यातील 27 वर्षांपूर्वीच्या म्हणजे कोकणातील जागृत अस्पृश्य समाजाचे चित्रण रंगवून बाबासाहेबांनी आपल्या अस्पृश्य बांधवांच्या मनात एक नवा आशावाद तर निर्माण केलाच, पण त्याचबरोबर अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी अस्पृश्य स्त्रियांची प्रगती होणे आवश्यक आहे. त्या प्रगतीसाठी शिक्षण कसे महत्त्वाचे आहे, म्हणून स्त्री-शिक्षणाकडे पाठ करून चालणार नाही, हा महत्त्वाचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भगिनींसमोर मांडावयाचा होता.
समाजातील जे वर्ग किंवा जे लोक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण करतात, त्यांना त्यांच्या या कामात पुढच्या शैक्षणिक जागृतीमुळे यश येत नाही. कारण अज्ञानमूलक भोळ्या समजुती शिक्षणामुळे नष्ट होतात, मनुष्य निर्भय होतो, जागृत होतो, हे ओळखून डॉ. बाबासाहेबांनी शिक्षण हे माणसाची गुलामी नष्ट करण्याचे व त्याच्यात स्वत्वाची ओळख करून देण्याचे व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे साधन मानले आहे. याचा अर्थ स्त्रियांमध्येही उच्च शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय, त्यांच्यात स्वत्वाची जाणीव निर्माण होऊन, त्या निर्भय होऊन त्यांचा जगण्यातील आत्मविश्वास वाढणार नाही आणि आत्मविश्वासाशिवाय त्यांची उन्नती होणार नाही, कारण आत्मविश्वास हा प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीची पहिली पायरी आहे. तेव्हा स्त्रियांमध्ये विशेषतः अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या उपेक्षित व असहाय्य स्त्रियांत आत्मविश्वास निर्माण झाल्याखेरीज त्यांची स्वत:ची, समाजाची व देशाची उन्नती होणार नाही. अशा प्रकारे आत्मविश्वास निर्माण करण्याचे “शिक्षण’ हे एक माध्यम आहे. जर स्त्रीवर्गात जागृती झाली तर त्या अस्पृश्य समाजाची फार मोठी प्रगती घडवून आणू शकतात, याची त्यांना जाणीव होती. महिलांच्या संघटित शक्तीवर, संस्थांवर त्यांचा विश्वास होता.
संघटित होण्यासाठी, संघटित होऊन समाजातले दुर्गुण नष्ट करण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे, ही बाबासाहेबांची स्त्री-शिक्षणविषयक भूमिका होती. या भूमिकेतूनच त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना “तुम्ही सर्वप्रथम शिक्षित व्हा, स्वच्छता पाळा, आपल्या मुला-मुलींना शिकवा, त्यामुळे देशाचा विकास होईल, तुमच्या अस्मितेचाही विकास होईल. तुम्ही पण माणूस आहात, अशी तुम्हाला ओळख होईल, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे शिक्षणाचे महत्त्व डॉ. बाबासाहेबांनी स्त्रीवर्गासाठी विशद केले. एवढेच नव्हे तर त्यांनी प्रत्येक आईबापांचे असे कर्तव्य आहे की, माझ्यापेक्षा माझ्या मुलांना चांगले दिवस कसे येतील, म्हणून त्यांच्यात महत्त्वाकांक्षा जागवायला पाहिजे, असा हितोपदेशही त्यांनी केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा