स्त्री भ्रूणहत्या हा देशावरचा सर्वात मोठा कलंक

  • पुलकसागरजी महाराज यांचे प्रतिपादन

बारामती -आज एक स्त्री हिच स्त्रीला जन्म घेऊ देण्याला विरोध करते ही चिंतेची बाब आहे. नवजात अर्भके रस्त्याच्या कडेला फेकून दिली जातात, लिंगपरिक्षण करुन मुलगी असेल तर गर्भपात केला जातो, भ्रूणहत्या हा या देशावरचा सर्वात मोठा कलंक आहे तो दूर करणे ही आजची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रसंत 108 पुलकसागरजी महाराजांनी केले.
चातुर्मासानिमित्त बारामतीतील दिगंबर जैन बांधवांच्या वतीने येथील श्री महावीर भवन येथे आयोजित ज्ञानगंगा महोत्सवात रविवारी (ता. 13) त्यांनी बेटी बचाओ या विषयावर मार्गदर्शन केले.

मुलगी असण्यासारखे दुसरे भाग्य नाही, ज्यांच्या घरात मुली नाहीत ते कमनशीबी म्हणावे लागतील, आज वार्धक्‍यात मुले पत्नीच्या तालावर नाचतात पण मुली सासरी राहूनही आई वडीलांची सतत काळजी घेतात ही वस्तुस्थिती आहे. मुलांमुळे वंश पुढे चालतो म्हणून मुले हवीत हा समज चुकीचा आहे, विनोबा भावे किंवा स्वामी विवेकानंद आणि भगवान महावीर यांच्या मुलांमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांचा वंश पुढे चालला. भगवान महावीर तर अविवाहीत होते पण आज अडीच हजार वर्षांनंतरही जैन समाज आम्ही महावीरांचे वंशज आहोत असे म्हणतात कारण त्यांचे जीवन महान होते.

स्त्रीभ्रूण हत्या हा या देशावरील सर्वात मोठा कलंक आहे, सर्रास काही पैशांसाठी गर्भपात केले जातात, मानवता रसातळाला जात आहे ही चिंताजनक बाब असून मुलींची भ्रूणहत्या करणा-यांना खूनासाठी जी शिक्षा दिली जाते तशीच कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे,एकीकडे तिजोरीत सर्वांना लक्ष्मी हवी पण आईच्या पोटात लक्ष्मी असेल तर लगेच तिच्या हत्येसाठी पुढे सरसावता हे महापाप आहे याची जाणीव महाराजांनी करुन दिली.
ज्या दवाखान्यात असे गर्भपात केले जातात हे दवाखाने म्हणजे कत्तलखाने आहेत अशा शब्दात त्यांनी या प्रकाराची निर्भत्सना केली. संवेदनशीलता कायम राखा आणि मुलींच्या जन्माचा आनंद साजरा करा, मुलींसाठी सर्वस्व अर्पण करा असा संदेश त्यांनी दिला.

  • निवडणूक लढविण्यास मनाई करा…
    ज्यांना मुलगी नाही अशा लोकांना निवडणूक लढविण्याचाच अधिकार मिळू नये असे पुलकसागरजी महाराज गंमतीने म्हणाले. ज्यांच्या घरात मुलगी नाही अशा घरात आपली मुलगीही देताना विचार व्हायला हवा असाही संदेश त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)