स्त्री भ्रुणहत्येला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींना ठेचा – जिल्हाधिकारी

स्त्री भ्रुणहत्या हा समाजाला लागलेला कलंक


पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करा

कोल्हापूर :  स्त्री भ्रुणहत्या हा समाजाला लागलेला कलंक असून स्त्री भ्रुणहत्येचा हा कलंक पुसून टाकण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन स्त्री भ्रुणहत्येला प्रोत्साहन देणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढा, असा इशारा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिला.

जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी विषयक कार्यशाळा येथील हॉटेल ॲट्रिया येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी.जी. शिंदे, ॲड. शरयु पाटील, ॲड. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, रेडिऑलॉजिस्ट सुनिल कुबेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख, पीसीपीएनडीटी कायदे सल्लागार ॲड. गौरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर्स तसेच गर्भपात केंद्रांची अचानकपणे तपासणी करुन दोषी आढळणाऱ्या केंद्रावर पीसीपीएनडीटी कायद्यांन्वये कडक कारवाई करावी, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याबरोबरच विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी या कामी सक्रिय होणे काळाची गरज आहे. स्त्री भ्रुणहत्या करणारी तसेच स्त्री भ्रुणहत्येला प्रोत्साहन देणारी प्रवृत्ती वाईटच असून या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास सर्व यंत्रणांनी कटीबध्द व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर जिल्ह्यात 1000 मुलांमागे 931 मुलींचे प्रमाण आहे. हे व्यस्तप्रमाण वेळीच रोखण्यासाठी कायद्याबरोबरच लोक शिक्षणाची गरज आहे. यासाठी आरोग्य विभागाने या कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्वाचे आहे. सुबत्ता लाभलेल्या  तालुक्यात स्त्री भ्रुणहत्येचे अधिक प्रमाण असून ही चिंतेची बाब आहे. यापुढील काळात जिल्ह्यात एकही स्त्री भ्रुणहत्या होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी कटीबध्द रहावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली. मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे खरी गरज असून त्यादृष्टीने संपूर्ण समाजाने सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी  करुन कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी सूचना करुन जिल्हाधिकारी म्हणाले, कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच कोर्टात तात्काळ केसेस दाखल करणे, तपासण्या कडक करणे तसेच कोर्टात दाखल केलेल्या केसेस योग्य प्रकारे मांडणे याबाबतही आवश्यक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

महिला सक्षमीकरणाचे काम जिल्ह्यात प्रभावीपणे होत असून आज महिलांनी स्वकर्तृत्वाने समाजातील विविध क्षेत्रे पदाक्रांत केली आहेत. महिलांना संधी दिल्यास त्या संधीचे सोनं करतात, हे महिलांनी सिध्द करुन दाखविले आहे. त्यामुळे महिलांना कमी लेखणे, हिणवणे  यापुढे सहन करता कामा नये. महिलांना समाजाने योग्य सन्मान देणे गरजेचे असल्याचेही सुभेदार यांनी यावेळी स्पष्ट केले. महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलवा, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील म्हणाले, जिल्ह्यात पीसीपीएनडीटीची कायद्याची अंमलबजावणी करण्यास यंत्रणेने प्राधान्य दिले असून अलिकडे मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण काहीसे वाढत आहे ही समाधानाची बाब असली तरी अजूनही मुलींचा जन्मदर वाढणे काळाची गरज आहे. पीसीपीएनडीटी कायद्यांन्वये जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सची दर तीन महिन्याने तपासणी केली जात आहे. महिला सक्षमीकरणाचे बेटी बचाओ, बेटी पढाओ या सारखे विविध उपक्रम  हाती घेतले असून कायद्याच्या अंमलबजावणी बरोबरच समाज जागृतीच्या कामासही प्राधान्य दिले आहे.

याप्रसंगी कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सी.जी. शिंदे, ॲड. शरयु पाटील, ॲड. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी यांनीही पीसीपीएनडीटी कायदा, अंमलबाजवणी आणि उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 पीसीपीएनडीटी कायदे सल्लागार ॲड. गौरी पाटील यांनी स्वागत करुन कार्यशाळेचा उद्देश विषद केला. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास देशमुख यांनी आभार मानले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील समयुचीत प्राधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)