स्त्री शिक्षणाची मशाल घेवून निर्भिडपणे चालणारे, मानवधर्माच्या समानतेचे बीज पेरायला निघालेले; क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. सनातनी समाजव्यवस्थेला क्रांतीकारी विचारांनी धक्का देणाऱ्या क्रांतीसूर्य ज्योतिबांचे विचार किती पुरोगामी होते हे आज आपल्याला पावलोपावली अनुभवास येते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्याची ही ओळख..
विद्येविना मति गेली
मतिविना नीती गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
इतके अनर्थ एका अविद्येने केले..
अविद्येचा अनर्थ सांगणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात भिडेंच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि इथल्या सनातनी समाजव्यवस्थेला जबरदस्त धक्का दिला होता. धर्मव्यवस्थेने इथल्या स्त्रीयांना आणि शुद्रांना शिक्षणाचा अधिकारच नाकारला होता. मनुस्मृती सांगत होती न स्त्री स्वातंत्र्य मर्हती. स्त्रीला स्वातंत्र्यच नाहीच. स्त्रीला शिक्षणाचा, सत्तेचा, संपत्तीचा अधिकार नव्हता.
स्त्री म्हणजे नरक मार्गस्थ दीपिका, स्त्री म्हणजे पापाचे मूळ ही मानसिकता असणाऱ्या समाजात जिथं धर्मव्यवस्थेचे प्राबल्य होते, तिथं महात्मा फुले स्त्री शिक्षणाची कवाडं उघडतात आणि सनातनी समाज व्यवस्थेला जबरदस्त खिंडार पाडतात. भारतीय समाज व्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच फुले स्त्री शिक्षणाची आणि स्त्री-पुरुष समानतेची मांडणी करतात. आपली पत्नी सावित्रीबाई फुले हिला शिकवतात आणि शिक्षिका म्हणून शाळेत शिकवायला पाठवितात. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका.
ज्या समाजात बायकांची मजल हळदी-कुंकू समारंभ, उपासतापास, व्रतवैकल्य, देवधर्म या पलिकडे जात नाही. अशा समाजात महात्मा फुले आपल्या पत्नीला शिकवतात आणि आपल्या समाजकार्यात बरोबरीची भागीदारी करुन घेतात. हे मोठे क्रांतिकारी कार्य होते. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका होत्या. त्यांनी एक रुपयाही पगार न घेता 11 वर्षे शिक्षिकेचे काम केले. स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. पुरुष शिकला तर एकटाच शिक्षक होतो. परंतु स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते ही महात्मा फुलेंची शिकवण होती.
स्त्रीयांना विद्याबंदी होती, बालविवाह, विधवा विवाहबंदी, विधवा केशवपन, पुनर्विवाह बंदी, वारसा हक्क नाही अशा अनेक दास्य शृंखलामध्ये स्त्री अडकली होती. बालविवाहामुळे बाल विधवांचे प्रमाण जास्त होते. विधवांच्या तारुण्य सुलभ अवस्थेमुळे किंवा पुरुषांकडून फसवल्या गेल्यामुळे गर्भपात, बालहत्या, आत्महत्या होत असत. अशा महिलांसाठी महात्मा फुले 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करतात. पुण्यात या गृहाच्या जाहिराती लावतात.
बालहत्या प्रतिबंधकगृह विधवांनो, जोतीराव गोविंदराव फुले यांच्या घरी येवून सुरक्षितपणे बाळंत व्हा. आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल. तुम्ही आपलं मुल न्यावे अथवा इथे ठेवावे. हे तुमच्या खुशीवर राहील. त्या मुलाचे आम्ही पालन करु”
बाईला असं माणूसपण देणारा महात्मा फुलेंसारखा महात्मा विरळच. महात्मा फुलेंनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली. स्त्रीयांसाठी शाळा काढल्या.
महात्मा फुलेंच्या शाळेतील 11 वर्षाच्या मुक्ता साळवी या चिमुरड्या पोरीनं लिहिलेला “आम्ही आणि आमचा धर्म’ हा निबंध जरी वाचला तरी त्यांच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा आपल्या लक्षात येतो. महात्मा फुलेंनी चालविलेल्या मुलींच्या शाळा ह्या आदर्श शाळा होत्या. जीवनदायी शाळा होत्या. त्यांच्या शाळेच्या परीक्षा प्रकट घेतल्या जायच्या. पुना ऑब्झरव्हरसारख्या वृत्तपत्रानेही महात्मा फुलेंच्या शाळांची दखल घेतली आहे. महात्मा फुलेंच्या शाळेत श्रमप्रदान शिक्षण होते.
महात्मा फुलेंनी प्रामुख्याने भारतीय स्त्रीयांच्या दास्यमुक्तीचे प्रयत्न केले. यासाठी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि स्त्री-पुरुष समानतेची मशाल पेटविली. महात्मा फुलेंची ही स्त्री उद्धारक चळवळ जगामध्ये स्त्रीला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणारी चळवळ होती. म्हणूनच आज आम्हाला स्त्रीयांचे नेतृत्व मान्य होते. जीवनातील सर्वच क्षेत्र स्त्रीयांनी आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पादाक्रांत केले आहे. हे असे असले तरी दारिद्य्र, परावलंबित्व, अंधश्रद्धा, दुष्ट रुढी परंपरा, अन्याय, अत्याचार हे आजही स्त्रीयांचे प्रमुख प्रश्न आहेत. ते आम्हाला सोडवावे लागतील. यासाठी सर्वांनी पुढे यावे लागेल आणि महात्मा फुलेंच्या विचाराने स्त्रीला माणूसपण द्यावे लागेल.
– प्रा. कविता म्हेत्रे, म्हसवड
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा