पुसेगाव ः सायली गोडबोले यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करताना डॉ. सुरेश जाधव, सुंदरगिरी महाराज, सुनिलशेठ जाधव आदी. (छाया ः प्रकाश राजेघाटगे)

पुसेगाव, दि. 7 (प्रतिनिधी)- ः गार्गी, मैत्रिय, अरुंधती या वेदकालीन स्त्रीयांबरोबरच अलिकडच्या काळातील संत मीराबाई, राणी पद्मावती, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई, उमाबाई दाभाडे, येसुबाई, राणी लक्ष्मीबाई या महान महिलांच्या चरित्रांची पारायणे झाली तर आजच्या समाजातील स्त्रीयांची अस्मिता जागृत होईल, असे विचार प्रसिध्द लेखिका व निवेदिका सायली गोडबोले-जोशी यांनी व्यक्त केले.

कै. हनुमानगिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित सेवागिरी व्याख्यानमालेत “भारतीय स्त्री अस्मिता’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज,सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी अध्यक्ष सुनिलशेठ जाधव, जयंत लंगडे, नंदकुमार जोशी, डॉ. अंबादास कदम उपस्थित होते. त्या म्हणाल्या, मराठी इतिहासाचा कालखंड हा पूर्णतः अस्मितेने भारलेला आहे. मराठी माणूस हा विकला जात नाही याची धास्ती एकेकाळी दिल्लीपतींला होती. आज तोच माणूस विकला जातोय व आपली अस्मिता गहाण टाकून देशहिताला तिलांजली देतोय . स्वार्थी राजकारण करतो आहे. यासाठीच घराघरातील व्यक्तींची अस्मिता जागृत झाली तरच हा देश प्रगतीच्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचेल,असे सांगून त्या पुढे म्हणाल्या केवळ पदव्यांची माळ लावणाऱ्याला पदवीधर म्हणता येईल. पण पदवीधर व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही. मुलांना कर्तव्याची जाणीव करुन देणे व त्यांना सन्मागार्वर घेऊन जाणे हीच आईची खरी जबाबदारी असते.स्त्रीच्या स्त्रीत्वाचा मान राखणे ही प्रत्येक स्त्री बरोबरच समाजाची जबाबदारी आहे. पूर्वी मुली धर्मशास्त्रात पारंगत होत्या, तत्वज्ञानी होत्या पण, दुर्दैवाने आज मुलींना शिकवा असे सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्यातर निश्‍चितच शिवबाही जन्माला येतील. सध्या आपला समाजसुधारणेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आपण पुराणकाळापेक्षाही मागासलेलेच आहोत. यासाठीच घराघरातील व्यक्तींची अस्मिता जागृत झाली तरच हा देश प्रगतीच्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचेल असे सायली गोडबोले-जोशी म्हणाल्या. मोहन गुरव यांनी सूत्रसंचालन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)