स्ट्रगलर…

हिमांशू 

रूपेरी पडद्यावर आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या बहुतांश अभिनेत्यांच्या आयुष्यात ‘स्ट्रगल’ हा एक महाभयानक शब्द येऊन जातो. रातोरात स्टार होणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात. बहुतांश कलावंतांना चांगली संधी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. संधी मिळतेय असं वाटत असतानाच ती दुसऱ्या कलावंताकडे जाते आणि हताशपणे ते पाहावं, सोसावं लागतं. अनेकजण मानसिकदृष्ट्या खचून जातात, तर काहीजण याही परिस्थितीत मन घट्ट ठेवून अविरत झगडत राहतात. हळूहळू यश मिळू लागतं आणि कलावंत चित्रपटसृष्टीत स्थिरावतो. त्याचं विश्‍वच बदलून जातं. आता तो जाईल तिथं त्याला पाहायला गर्दी होऊ लागते. चाहते पूर्वी स्टारमंडळींचे ऑटोग्राफ घ्यायचे; आता सेल्फीसाठी धडपडतात. असं वलय निर्माण झाल्यानंतर कधीतरी त्या कलावंताचं लक्ष नवोदित कलावंतांकडे जातं आणि त्याला स्वतःचा संघर्षाचा काळ आठवतो. आपली कारकीर्द सुरू होण्यापूर्वी आपल्याला कशाकशातून जावं लागलं हे एखाद्या नवोदिताला सांगावंसं वाटतं. संघर्ष करणारा एखादा परिचित नवोदित कलावंत भेटायला आला, तर हा त्याला आपली कहाणी ऐकवतो. खरं तर स्थिरावलेल्या कलावंताकडून थेट मदत मिळावी अशी ओळखीच्या स्ट्रगलरला अपेक्षा असते. परंतु स्थिरावलेला अभिनेता त्याला मदत करण्याऐवजी लांबलचक व्याख्यान ऐकवून त्याची बोळवण करतो. त्या निमित्तानं मनातली खदखद मोकळी करतो. इंडस्ट्रीत कुणाशी बोलणार? कमल हसन आणि रजनीकांतला जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी मौलिक सल्ले दिले, तेव्हा आम्हाला हाच सीन आठवला.

“राजकारणात जरा बेतानंच प्रवेश करा,’ असं शत्रुघ्न सिन्हा यांनी या दोन दाक्षिणात्य सुपरस्टारना सांगितलं. त्या निमित्तानं एक गौप्यस्फोटही केला. आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार होतं; पण अखेरच्या क्षणी ते एका टीव्ही अभिनेत्रीला दिलं गेलं, असं ते म्हणाले. त्यांचा रोख स्मृती इराणी यांच्याकडे होता, हे चाणाक्षांनी ओळखलं. पडद्यावर नेहमी “खामोश’ म्हणणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षानं कसं “खामोश’ केलं याची दर्दभरी कहाणी त्यांनी या दोघांना सांगितली. राजकारण ही सोपी गोष्ट नाही. गर्दी जमवण्यासाठी अभिनेत्यांना नेते बनवलं जातं आणि गर्दी जमली की दूर केलं जातं, कलाकारालाही ग्लॅमर हवंच असतं. पण राजकारणात नेत्यांचं ग्लॅमर अभिनेत्यांच्या ग्लॅमरपेक्षा प्रभावी ठरतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सिन्हा यांची जखम आता स्पष्ट दिसू लागलीय. अभिनेत्यांना अभिनय शिकावा लागतो, त्यावर मेहनत घ्यावी लागते; पण नेत्यांना तो उपजतच येत असतो, हेही त्यांना आता समजलं असेल. शिवाय, चित्रपटसृष्टीतला संघर्ष कधीतरी संपतो. राजकारणातल्या संघर्षाला अंत नाही, हेही समजलं असेल.

पण खरं सांगू का? आपली करुण कहाणी ऐकवण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी स्ट्रगलर मात्र चुकीचे निवडले. बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये जो मूलभूत फरक आहे, तोच दाक्षिणात्य आणि उत्तरेकडच्या राजकारणात आहे. दाक्षिणात्य मंडळींना एक तर राष्ट्रीय राजकारणात रसच नाही. दुसरं म्हणजे, टॉलिवूडमधले अभिनेते दुसऱ्यांच्या पक्षात कधीच जात नाहीत, तर स्वतःचा पक्ष स्थापन करतात. राजकारणात येतानाच ते सर्वेसर्वा बनून येतात. हे बॉलिवूडवाल्यांना अजून जमलेलं नाही. त्यामुळं शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची संघर्षगाथा ऐकवण्यासाठी बॉलिवूडकरांची निवड करावी, हे उत्तम!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)