बीएस-4 साठी वाहन उद्योगाकडून अतिरिक्‍त मागणी

नवी दिल्ली: जिंदाल स्टेनलेसने गेल्या आर्थिक वर्षामध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्रात 25 टक्‍के विकासाची नोंद केली आहे, यासाठी नावीन्यपूर्णतः आणि निर्यातीच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गुंतवणूक करण्यात आली होती. भविष्यातही ऑटो क्षेत्रातील वाढत्या स्टेनलेस स्टीलच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे जिंदाल स्टेनलेस स्टीलचे विक्री विभाग प्रमुख विजय शर्मा म्हणाले.

ऑटो उत्पादक आता कमी वजनाची सामग्री वापर आणि अधिक स्वच्छ इंधनाचा वापर अशा दोन दृष्टिकोनांवर लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळे स्टेनलेस स्टीलला बहुतांश ऑटो घटकांमध्ये प्राधान्य मिळते. भारतात दुचाकी आणि प्रवासी वाहनांनी यापूर्वीच स्टेनलेस स्टीलचा वापर सुरू केला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयातर्फे उत्सर्जनासाठीचे कठोर नियम सादर करण्यात आले आहेत, भारत स्टेज (बीएस) नियमांद्वारे मर्यादा अधिक कडक करण्यात आल्या आहेत. हा नियम दुचाकी, तीन चाकी, अवजड वाहने आणि हलकी वाहतूक करणारी वाहने अशा सर्व प्रकारांना लागू आहे. भारतीय ऑटो क्षेत्राने, जर्मनीला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकांचे सर्वात मोठे उद्योगक्षेत्र म्हणून स्थान पटकावले आहे. या क्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षात वाहनांच्या उत्सर्जनातून होणाऱ्या पर्यावरणीय हानीमध्ये घट केली आहे.

गेल्या वर्षी जगभरातील स्टेनलेस स्टील उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. जिंदाल स्टेनलेसने होंडा ग्रूप, यामाहा, बजाज, अशोक लेलॅंड, टाटा मोटर्स आणि टोयोटा यासारख्या विश्‍वासार्ह ऑटोमोटिव्ह समूहांबरोबर भागीदारी केली आहे. या क्षेत्राकडून स्टेनलेस स्टीलची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)