निमोणे- निमोणे येथे स्टेट बॅंक ऑफ इंडियाची शाखा असून येथील बॅंकेतील ग्राहकांना अनेकवेळा सेवा नीट मिळत नाही. त्यातच वारंवार सर्व्हर डाऊन झाल्याने ग्राहकांना तासन्तास बॅंकेत बसून राहावे लागत आहे. या शाखेत कर्मचारी कमी असल्याने सेवा देण्यास अडथळे येत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.निमोणे हे शिरुर – तांदळी रस्त्यावरील महत्त्वाचे गाव असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक आहे. तसेच निमोणे येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो.त्यामुळेच स्टेट बॅंक ऑफ इंडिया ही बॅंक निमोणे येथे आणण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. त्यासाठी ग्रामपंचायत इमारत बॅंकेसाठी उपलब्ध करुन दिली. बॅंकेचे एटीएमही आहे. परंतु बॅंक सुरू झाल्यापासून अजूनही येथे सेवा नीट मिळत नाही. ग्राहकांना अनेकवेळा बॅंकेत ताटकळत थांबावे लागत आहे. इंटरनेट सेवा व्यवस्थित चालत नसल्याने कायम बॅंकेचा सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे बॅंकेत आलेल्या ग्राहकांना ताटकळत बसावे लागते. या शाखेत तीनच कर्मचारी असल्याने काम संथगतीने सुरू असते. त्यामुळे या बॅंकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी तसेच बॅंकेत इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा