तत्काळ अंमलबजावणी सुरू

वैयक्‍तिक कर्जावरील हप्त्यात होणार लवकरच वाढ

इतर बॅंकांही लवकरच व्याजदरात करणार वाढ

नवी दिल्ली: अगोदरच रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात दोन वेळा वाढ केल्यामुळे बऱ्याच बॅंकांनी ठेवी आणि कर्जावरील व्याजदरात वाढ केलेली आहे. आता रिझर्व्ह बॅंक नवे पतधोरण लवकरच जाहीर करणार असतानाच भारतातील सर्वात मोठी बॅंका असलेल्या स्टेट बॅंकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. तसेच या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे इतर बॅंकांही लगेच व्याजदरात याच प्रमाणात वाढ करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्राहकांना विविध कर्जासाठी देण्यात येणाऱ्या हप्त्याच्या रकमेत वाढ होणार आहे. रुपया महाग झाल्यामुळे आयात महाग होत आहे. त्याचबरोबर इंधनाचे दर विक्रमी पातळीवर गेल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. सरकारने पिकांना त्यांच्या उत्पादन किमतीच्या दीडपट भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना अधिक पगार मिळणार आहे. या कारणामुळे महागाई वाढेल म्हणून रिझर्व्ह बॅंकेने या अगोदरच्या दोन पतधोरणात रेपो दरात पाव टक्‍क्‍यानी वाढ केली आहे. बॅंकेला अजूही वाढ करावी लागते की काय, अशी शंका आता घेतली जाऊ लागली आहे. स्टेट बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यामुळे आगामी काळ अधिक महागाईचा आणि अधिक व्याजदराचा असण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जाऊ लागली आहे.

स्टेट बॅंकेने आज जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की बॅंकेच्या अल्प कालावधीच्या एमसीएलआर मध्ये 0.2 टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली आहे. हा दर अगोदर 7.9 टक्‍के इतका होता तो आता 8.1 टक्‍के इतका करण्यात आला आहे. या दरापेक्षा कमी व्याजदराने बॅंक कोणालाही कर्ज देत नाही. त्याचबरोबर एक वर्षाचा एमसीएलआर दर 8.25 टक्‍क्‍यांवरून 8.45 टक्‍के इतका करण्यात आला आहे. बहुतेक सर्व कर्जासाठी या दराचा बॅंकांकडून उपयोग केला जातो. तीन वर्षासाठीचा एमसीएलआर 8.45 टक्‍क्‍यांवरून 8.65 टक्‍के इतका करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने या अगोदरच्या पतधोरणात रेपोदरात पाव टक्‍का वाढ करून तो 6.25 टक्‍के इतका केला होता. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयानंतर एक महिन्याने स्टेट बॅंकेने व्याजदरात वाढ केली आहे. या अगोदर बहुतेक बॅंकांनी आपल्या विविध कालावधीच्या ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याअगोदर बॅंका ठेवीवरील व्याजदरात वाढ करीत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)