‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ची पुणेकरांनाही भुरळ

हिंदीतील “ट्रेन्ड’ आता मराठीतही : तरुणाईचा कल्ला

– कल्याणी फडके

पुणे – पूर्वी सादर होणाऱ्या संगीत नाटकांपासून ते एकपात्री प्रयोगांपर्यंत नाटकांना पुण्यात मोठा प्रतिसाद मिळतो. याच मालिकेत नव्याने रूजू पाहणारा “स्टॅन्ड अप कॉमेडी’ची भुरळ सध्याच्या तरुणाईला पडत आहे. त्यामुळेच पुण्यात विविध ठिकाणी स्टॅन्ड अप कॉमेडीचे “लाइव्ह शोज’ मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहेत.

थोडक्‍यात प्रेक्षकांसमोर सादर केलेली ही “लाइव्ह’कला. एकपात्री प्रयोगांप्रमाणेच सादर होणाऱ्या या प्रकारात जुन्या नव्या सर्वच विषयांवर विनोदाच्या माध्यमातून भाष्य केले जाते. विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आर्टिस्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. यू-ट्युब चॅनल्स, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांची कला हीच त्यांची ओळख होत आहे.

वेगवेगळ्या कॅफेमध्ये हे सादर करतात. नव्याने मनोरंजन या क्षेत्रात येत असलेल्या नवोदित कलाकारांना हे उत्तम माध्यम आहे. विनोदाची आवड असणारे पण व्यवसायाने थेट या क्षेत्राशी संबंधित नसणारे कलाकारसुद्धा यामध्ये सहभागी होतात. चांगले सामाजिक संदेश, चांगल्या गोष्टींची दखल, आजूबाजूला घडणाऱ्या बातम्या आणि महत्त्वपूर्ण घटनांवर मार्मिक शैलीतून भाष्य करणारे हे कलाकार प्रेक्षकांवर विशेषत: तरुणाईवर प्रभाव पाडत आहे. केवळ इंग्रजी आणि हिंदीच नाही, तर मराठी भाषेतही याचे नवनवीन प्रयोग होत आहेत.

स्टॅंडअप कॉमेडी शो सुरूवातीला फक्त मुंबईमध्ये चालायचे. त्यानंतर पुण्यात सुरू झाले आणि मराठीत प्रयोग करण्यात साहजिकच जास्त आनंद आहे. जितके प्रयोग आम्ही 4 वर्षांत हिंदी, इंग्रजी मध्ये केले, तितकेच प्रयोग दीड वर्षांत मराठीमध्ये केले. विशेष म्हणजे सर्वांत जास्त शो पुण्यामध्ये केले आहेत आणि या सर्वच प्रयोगांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाज आणि सामजिक समस्यांवर भाष्य करताना कोणाच्या भावना न दुखावता काळजीपूर्वक सादरीकरण करावे लागते.
– पुष्कर बेंद्रे, स्टॅन्ड अप कॉमेडी आर्टिस्ट


मी गेले साडेतीन वर्ष “ओपन माइक’द्वारे स्टॅंडअप कॉमेडी करतो. मायक्रोफोन आणि स्पीकर वापरुन स्वत:मधल्या लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्त्याला “फ्रीडम’ देणारे हे माध्यम म्हणजे कमी खर्चात होणारे “रायझिंग ट्रेंड’ आहे. मला ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर स्टॅंडअप करायला आवडतात. फक्त ते करताना खूप काळजीपूर्वक करावे लागते.
– साहिल होराणे, स्टॅन्ड अप कॉमेडी आर्टिस्ट


मी दोन वर्षांपासून या क्षेत्रात आहे. रोजच्या जीवनात आजूबाजूच्या प्रसंगांवर विनोदी शैलीत भाष्य करणारा स्टॅंडअप कॉमेडी हा विनोदाचा नवा प्रकार प्रेक्षकांना आवडतो आहे. आताची तरुण पिढी “परफॉर्मिंग आर्टस’ कडे वळतेय ही खूप चांगली गोष्ट आहे. बरेचसे आर्टीस्ट मार्मिक शैलीमध्ये काही विषय “अनफोल्ड’ करतात.
– वरद डोंगरे, स्टॅन्ड अप कॉमेडी आर्टिस्ट


मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी “अशक्‍य कॉमेडी नाईट’ ही निर्मितीसंस्था सुरू केली. आतापर्यंत वेगवेगळ्या कॅफेमध्ये याचे आयोजन केले आणि आमचे सगळे कार्यक्रम हाउसफुल्ल झाले आहेत. मराठी कला आणि मराठी विनोदासाठी आम्ही हा विचार केला होता. नवोदित कलाकारांना कविता, स्टॅंडअप कॉमेडी सादर करण्यासाठी “ओपन माईक’ (कोणीही आपली कला सादर करू शकते) व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा आमचा मुख्य हेतू आहे. असे “अशक्‍य कॉमेडी नाईट’ बद्दल सांगतो.
– आदित्य महाजन, “अशक्‍य कॉमेडी नाईट’.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)