स्टीव्हन स्मिथचा राजीनामा; राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व अजिंक्‍य रहाणेकडे

       चेंडू छेडछाड प्रकरणाचे अन्य क्षेत्रांतही पडसाद

नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात उघडकीला आलेल्या चेंडूशी छेडछाड प्रकरणाचे पडसाद विविध ठिकाणी उमटण्यास प्रारंभ झाला असून ऑसी कर्णधार स्टीव्हन स्मिथने आयपीएलच्या नव्यामोसमासाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. स्मिथच्या जागी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेची नियुक्‍ती करण्यात आल्याचे राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाने लगेचच जाहीर केले.

आयपीएलच्या 11व्या मोसमाला एप्रिलच्या पहिल्या आठवडाअखेर सुरुवात होत असून सध्याच्या परिस्थितीत खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी स्टीव्हन स्मिथने पदत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून राजस्थान रॉयल्स संघाच्या क्रिकेट विभागाचे प्रमुख झुबिन भरुचा म्हणाले की, आम्ही स्मिथ व बीसीसीआयशी सातत्यानं संपर्कात असून आमच्या सर्व पाठीराख्यांकडून या प्रसंगी पाठिंब्याची अपेक्षा करीत आहोत.

त्याच वेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटविश्‍वाची प्रतिष्ठा धुळीला मिळविणाऱ्या या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर स्टीव्हन स्मिथ व ऑसी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया गंभीरपणे विचार करीत असल्याचेही वृत्त आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सचा मेन्टॉर व महान गोलंदाज शेन वॉर्न याच्याशी चर्चा केल्यावरच स्मिथने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

दक्षिण आफ्रिकेत जे काही घडले, ते पूर्वनियोजित होते व त्यामुळे क्रिकेटची प्रतिष्ठा निश्‍चितच धोक्‍यात आली आहे. अशा वेळी स्मिथवरही कमालीचे दडपण असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आमच्यासाठी क्रिकेटची प्रतिष्ठा आणि खिलाडूवृत्ती या गोष्टींना सर्वोच्च महत्त्व आहे, असे सांगून राजस्थानचे सहमालक मनोज बडाले म्हणाले की, अशा आणीबाणीच्या वेळीही आमच्याकडे अजिंक्‍य रहाणेसारखा समर्थ पर्याय उपलब्ध आहे हे आमचे सुदैवच आहे. रहाणेने नेहमीच कोणत्याही अवघड प्रसंगी संघाच्या हाकेला ओ दिली आहे. तसेच राजस्थानसाठी त्याची कामगिरीही असामान्य आहे. आगामी मोसमात रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघ चमकदार कामगिरी बजावेल असा आम्हाला विश्‍वास वाटतो.

 वॉर्नरबाबत हैदराबादचे “वेट अँड वॉच’

चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या आयपीएलमधील सहभागाबद्दल अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. परंतु हैदराबाद सनरायजर्स संघाने वॉर्नरबाबत कोणताही निर्णय घतेला नसून “वेट अँड वॉच’ धोरण अवलंबले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हैदराबादचा मेन्टॉर व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, वॉर्नरबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा अंतिम न्निर्णय काय होतो, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यानंतरच आम्ही आमचा निर्णय जाहीर करू. वॉर्नरवर आजीवन बंदी घालण्यात आल्यास पर्यायाबाबत विचार केला आहे काय, असे विचारले असता लक्ष्मण म्हणाला की, आम्ही त्याबाबत अद्याप विचारही केलेला नाही.

गेल्या काही वर्षांपासून हैदराबादची कामगिरी चांगली झालेली नाही. परंतु या वेळी नव्या लिलावातून आमच्याकडे डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, भुवनेश्‍वर व केन विल्यमसन या नेहमीच्या खेळाडूंबरोबरच वृद्धिमान साहा, शकिब अल हसन व युसुफ पठाण असे नवे खेळाडूही आले आहेत. हा एक उत्तम संच असून येत्या 30 मार्चपासून आमचा सराव सुरू होत आहे. परंतु नव्या घटनाक्रमामुळे आम्ही अस्वस्थ झालो आहोत आणि नव्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)